मराठी विश्वकोश : खंड ९ परीक्षापद्धति, शैक्षणिक : पान १


Click here for Floating Keyboard Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

परीक्षापद्धति, शैक्षणिक : विद्यार्थ्यांनी कितपत ज्ञान संपादित केले, संपादित ज्ञानाचे उपयोजन त्यांना कितपत करता येते, प्राप्त केलेल्या क्रियाकौशल्यांचा त्यांना किती परिणामकारक रीतीने उपयोग करता येतो वा त्यांनी प्राप्त केलेल्या क्रियाकौशल्यांची गुणवत्ता किती आहे व तिचा किती परिणामकारक रीतीने उपयोग करता येतो इ. प्रश्नांची उत्तरे ज्या प्रक्रियेतून मिळतात, तिला शैक्षणिक परीक्षा असे स्थूलमानाने म्हणता येईल. नियत कालावधीत अध्ययन-अध्यापन पुरे झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. शिक्षणशास्त्रातील आधुनिक कल्पनांनुसार परीक्षापद्धतीत शिकणाऱ्‍याची अभ्यासातील प्रगती, शिकविणाऱ्‍याची अध्यापनपद्धती, अभ्यासक्रमाची योग्यायोग्यता, शिकणाऱ्‍याच्या अभ्यासाच्या सवयी, ज्या ठिकाणी अध्ययन-अध्यापन चालते. तेथील शिक्षणानुकूल वातावरण तसेच ज्या प्रशासनाखाली शिक्षण चालते, त्याची परिणामकारकता यांसारख्या सर्वच गोष्टींची गुणवत्ता जोखली जाते.

 स्थूल ऐतिहासिक आढावा : परीक्षापद्धतीला विशेष महत्त्व देऊन काटेकोरपणे तिचा उपयोग करणारा पहिला देश चीन होय. इ.स. पू. सातव्या शतकापासून तेथे परीक्षापद्धत चालू झाली आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत तीच पद्धत अव्याहत चालू होती. देशाच्या राज्यकारभारासाठी लायक व्यक्तींची निवड करणे, हा या परीक्षेचा हेतू होता. कनिष्ठ, मध्यम व वरिष्ठ अशा तीन चढत्या पातळ्यांवर क्रमशः ती घेतली जाई. कनिष्ठ पातळीवरील परीक्षा जिल्हास्तरांवर, तर वरिष्ठ परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होई. धर्मशास्त्रीय आणि काव्यशास्त्रीय विषयांवर निबंधरचना हाही परीक्षेचा महत्त्वाचा भाग असे. बुद्धिमान व्यक्तींची निवड करण्यावर भर असल्याने परीक्षांचे निर्णय कडक असत. त्यांना देण्यात येणाऱ्‍या पदव्या ‘बुद्धि-पुष्प’, ‘उत्तीर्ण पंडित’ आणि ‘प्रविष्ट पंडित’ या अर्थाच्या असत. प्रविष्ट पंडितांतून उच्च शासकीय अधिकारपदांसाठी व्यक्ती निवडल्या जात. शाही अकादमीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रविष्ट पंडितांनाही उच्चतम परीक्षा द्यावी लागे.

ध्ययुगीन युरोपमध्ये इटलीतील बोलोन्या विद्यापीठात विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी आपल्या विषयासंबंधी आपले शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी यांच्याशी वादविवाद करावा लागे, तटस्थ निरीक्षक त्या वादविवादाचे निरीक्षण करीत व त्यावरून विद्यार्थ्याला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय देत. हे निरीक्षक तिपाईवर (ट्रायपॉस) बसत असत. त्यावरून केंब्रिज विद्यापीठात दिल्या जाणाऱ्‍या पदव्यांना ‘ट्रायपॉस’’ म्हणण्याचा प्रघात पडला. सोळाव्या शतकात जेझुइट लोकांनी प्रथम तोंडी परीक्षेची पद्धत सुरू केली. इ. स. १५९९ मध्ये परीक्षा कशा घ्याव्यात, याबद्दल त्यांनी एक नियमावली तयार केली. १८३२ पर्यंत ती बदलण्यात आलेली नव्हती. या पद्धतीमध्ये पाठांतर व विद्यार्थ्यांमधील चढाओढ या गोष्टींवर भर दिलेला होता. सामान्यतः एकोणिसाव्या शतकात पश्चिमी विद्यापीठांतून औपचारिक परीक्षेस सुरुवात झाली.

प्राचीन भारतात परीक्षेची अशी तंत्रनिष्ठा व औपचारिक पद्धती नव्हती. गुरुगृही चालणाऱ्‍या अध्ययनात एक संथा पचनी पडली, की पुढची संथा मिळे. गुरुकुळात प्रत्यक्ष काम करून व्यावहारिक शिक्षण मिळे आणि सामाजिक विकासही घडे. जरा वरच्या स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा शलाकापद्धतीने घेतली जाई. म्हणजे ग्रंथात कोणतेही पान काडी घालून उघडावयाचे व त्या पानावरील भागाचे स्पष्टीकरण विद्यार्थाला करता आले पाहिजे, अशी अपेक्षा होती. साहित्यग्रंथांचा अर्थ लावताना व्याकरण, अलंकार, रस-ध्वनी इत्यादिंचेही विवरण करता आले पाहिजे, अशी अपेक्षा होती. विद्वत् -परिषदांत पंडितांची परीक्षा घेतली जाई. अध्ययनाची सखोलता, विवेचनाची स्पष्टता यांबरोबरच वक्तृत्व, वादकौशल्य, व्युत्पन्नमतित्व, समयचातुर्य इ. गुणही पारखले जात. भारतात विद्यापीठे निघाल्यावर ‘पारंगत’, ‘मयूरव’, ‘भास्कर’ इ. पदव्या (उपाधी) देण्याचीही पद्धती सुरू झाली. परीक्षांचे स्वरूप सर्वस्वी मौखिक होते.

 

कोणिसाव्या शतकात जी शिक्षणपद्धती बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत रूढ झाली, तिच्यात श्रेणीबद्ध इयत्ताक्रम आणि वर्गपद्धती यांना महत्त्व आले. सामुदायिक अध्ययन, एकेका इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम व त्यामुळे सर्वांना समान परीक्षा या गोष्टी रूढ झाल्या. समान परीक्षा घ्यावयाला लेखी परीक्षांचे तंत्र सुलभ असल्याचे अनुभवास आले. वेळेची बचत हाही मोठाच फायदा होता. वर्षाअखेर विद्यार्थ्यांची सर्व विषयांची परीक्षा घ्यावयाची, काही ठराविक टक्के गुण मिळाले, की ते पुढील वर्गात जावयास पात्र म्हणजे उत्तीर्ण समजावयाचे, अशी ही पद्धत अगदी पहिल्या इयत्तेपासून पदवी परीक्षेपर्यंत सर्वत्र सारखीच तयार झाली. विद्यार्थ्यांना तीन तासांत सोडविता येतील, इतकेच प्रश्र द्यावयाचे असल्याने प्रश्रसंख्या मर्यादित झाली. प्रश्रांची उत्तरे निबंधात्मक स्वरूपात अपेक्षिली जात. ‘फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे सांगा’, किंवा ‘अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्धच्या लढ्याची कारणे देऊन परिणामांची चर्चा करा’, असे मोघम नि व्यापक स्वरूपाचे प्रश्र विचारले जात. ब्रिटिशांनी भारतात आपली शिक्षणपद्धती आणली, तेव्हा आपली परीक्षापद्धतीही आणली. हुशार विद्यार्थी निवडणे व त्यांना नोकऱ्‍या देणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट असल्याने परीक्षेत चढाओढीला महत्त्व आले आणि नोकरीशी सांगड बसली.

 

रीक्षापद्धतीची उद्दिष्टे : विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती तपासणे, हा परीक्षेचा प्रमुख हेतू असतो; परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांला अभ्यासाची प्रेरणा लाभावी, पुष्कळ गुण आणि वरची श्रेणी मिळविण्यास त्याने प्रवृत्त व्हावे, अपयश आल्यास असे अपयश का आले, याचे त्याने आत्मसंशोधन करावे इ. हेतू परीक्षेतून साध्य होतात.

ध्यापनातील गुणदोष लक्षात येण्यासाठीही परीक्षापद्धतीचा उपयोग संभवतो. मुलांची बौद्धिक कुवत आणि पूर्वतयारी यांचा विचार करून अध्यापन करावे लागते. त्याचप्रमाणे सर्वच विषयांसाठी एकच अध्यापनपद्धती वापरून चालत नाही. तेव्हा अध्यापन परिणामकारक झाले आहे की नाही, हे परीक्षेच्या साहाय्याने कळू शकते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करणे, हा परीक्षेचा तिसरा हेतू. विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत, कल, अभिरुची इ. लक्षात घेऊन त्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणता व्यवसाय निवडावा यांचे मार्गदर्शन चाचणी घेऊन करता येते. 

विशिष्ट अभ्यासक्रमासाठी निवड करणे हा परीक्षांचा चौथा हेतू होय. उच्च अभ्यासक्रमसाठी जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी स्थिती असते. तेव्हा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करणे भाग असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे, हा परीक्षापद्धतीचाच एक घटक आहे. 

खंडनिहाय नोंद शोध

Scroll to top