मराठी विश्वकोश : खंड १० पान ४ - Page 4


Click here for Floating Keyboard Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

 

 भारत :भारतातील प्रतिष्ठानांना एकोणिसाव्या शतकापासूनची परंपरा आहे. भारतीयनोंदणी अधिनियम, १९६० व भारतीय न्यास अधिनियम, १८८२ यांनुसार भारतातील प्रतिष्ठाने व न्यास यांचे नियमन केले जाते. भारतीय समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक सेवाभावी व्यक्तींनी तसेच संघटनांनी मोठ्या रकमा जमा करून आधुनिक काळात प्रतिष्ठाने व न्यास स्थापन केले.

 

ज्या संघटनांचे कार्य कला, नैसर्गिक व सामाजिक विज्ञाने, खेळ, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या क्षेत्रांशी निगडित आहे आणि ज्या कार्यात वैयक्तिक फायदा अभिप्रेत नाही, अशा संघटनांना भारतीय नोंदणी अधिनियमाखाली संस्था म्हणून नोंदणी करून घ्यावी लागते. सार्वजनिक न्यास अधिनियमाखालीही त्यांना सक्तीने नोंद करावी लागते. भारतातील अनेक राज्यांत सार्वजनिक न्यास अधिनियम केलेले आहेत. उदा., महाराष्ट्रात मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम,  १९५० आहे. त्याखाली कोणत्याही प्रतिष्ठानाची स्वतंत्रपणे नोंद करता येते [→ नोंदणी].

 

भारतात खाजगी व सार्वजनिक अशी दोन प्रकारची प्रतिष्ठाने आहेत. मृत्युपत्रान्वये व्यक्तीला आपल्या खाजगी मालमत्तेचे प्रतिष्ठान स्थापन करता येते व अज्ञान वारस सज्ञान होईपर्यंत सर्व मालमत्ता विश्वस्तांकडे सोपवून त्याची देखरेख करता येते [→ विश्वस्त पद्धति]. ही खाजगी प्रतिष्ठाने होत. परंतु आयकरातील सवलतींचा फायदा घेण्याकरिता अनेक धनिकांनी खाजगी प्रतिष्ठाने स्थापन केली आहेत. आयकरविषयक सवलतींचा दुरुपयोग होत असल्याने १९८०-८१ सालापासून अशा खाजगी प्रतिष्ठानांना मिळणारी सवलत सरकारने काढून घेतली आहे. खाजगी प्रतिष्ठाने विधिदृष्ट्या जरी प्रतिष्ठाने असली, तरी त्यांपासून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबियांनाच मिळते; ते सार्वजनिक कार्यास उपयोगी पडत नाही.

 

गांधी स्मारक निधीने स्थापिलेल्या ‘गांधी शांतता प्रतिष्ठाना’च्या भारतामध्ये ४५ शाखा असून त्यांमार्फत विविध उपक्रमांद्वारा गांधीजींच्या ध्येयवादाचा प्रसार केला जातो. देशातील सर्वांत जुने प्रतिष्ठान म्हणून ‘जे. एन्. टाटा एन्डाउमेंट फॉर हायर एज्युकेशन’ याचा उल्लेख करता यईल. हे प्रतिष्ठान १८९२ साली स्थापन झाले. त्याचा सु. एक हजार विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी फायदा मिळाला असून त्याकरिता या प्रतिष्ठानाने सु. एक कोटी रुपयांचा विनियोग केला आहे. याखेरीज टाटा उद्योगसमूहाने ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ (१९१८), ‘लेडी मेहेरबाई डी. टाटा एज्युकेशन ट्रस्ट’ (१९३२), ‘लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट’ (१९३२), ‘लेस्ली सॉहनी मेमोरियल ट्रस्ट’ (१९६८) इ. प्रतिष्ठाने निर्माण केली असून त्यांद्वारे शिक्षण, आपद्‌ग्रस्तांसाठी साहाय्य, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक व औद्योगिक कल्याणकार्य अशी कामे केली आहेत. टाटा उद्योगसमूहाच्या न्यासातूनच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर; ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई; टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई; ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई अशा नामवंत आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्था उभ्या राहिल्या. प्रतिष्ठानांच्या बाबतीत टाटा उद्योगसमूहाची कामगिरी मोलाची आहे [→ टाटा घराणे].

 

बिर्ला उद्योगसमूहानेही प्रतिष्ठाने निर्माण करून सामाजिक कार्य केले आहे. राजस्थान राज्यातील पिलानी येथे त्याने मोठी तंत्रविद्या तथा विज्ञान संस्था निर्माण करुन अद्ययावत तांत्रिक शिक्षण देण्याची सोय केली आहे. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रातील संशोधनासाठी दिल्ली येथे एक स्वतंत्रसंस्था व कलकत्ता येथे अंतराळनिरीक्षणासाठी कृत्रिम तारामंडळ उभारले आहे. [ बिर्ला घराणे]. जैन उद्योगसमूहाने भारतीय ज्ञानपीठ न्यास उभारून त्याच्यातर्फे दरवर्षी एक लाख रुपयांचे पारितोषिक भारतातील एका थोर साहित्यिकाला देण्यास १९६५ पासून आरंभ केला.

 

हाराष्ट्रातील अनेक उद्योगसमूहांनीही प्रतिष्ठाने स्थापून सामाजिक सेवा केली आहे. किर्लोस्कर प्रतिष्ठानाच्या वतीने लहान कारखानदारांना बॅंकेकडून कर्ज मिळविण्यासाठी पूर्वी जामीन दिला जात असे; आता अनेक विषयांतील प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात [→ किर्लोस्कर घराणे]. गरवारे धर्मादाय न्यासाच्या वतीने अनेक शिक्षणसंस्थांना, अनेक रुग्णालयांना देणग्या देण्यात येतात. इचलकरंजीचे उद्योगपती पंडितराव कुलकर्णी ह्यांनी स्थापिलेल्या ‘फाय प्रतिष्ठान’ तर्फे प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे बक्षीस देशातील कोणत्याही सामाजिक क्षेत्रातील सेवा करणाऱ्या थोर व्यक्तींना दिले जाते. याखेरीज उद्योग, शास्त्रीय संशोधन, कला, साहित्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी रु. २५,००० ची अनेक पारितोषिके दिली जातात. पारखे उद्योगसमूहाने कागद उद्योगातील उच्च संशोधनासाठी ‘पारखे संशोधन प्रतिष्ठाना’ ची स्थापना केली आहे. ‘गोपाळराव पारखे पारितोषिक प्रतिष्ठान’ प्रतिवर्षी नव्या होतकरू उद्योजकांना पारितोषिके देते; पारखे उद्योगसमूहपुरस्कृत ‘गदिमा प्रतिष्ठान’, ‘मातुश्री माईसाहेब न्यास’, ‘श्री. एंजल्स मेमोरियल ट्रस्ट’ ह्यांद्वारा गोधन संवर्धन, शैक्षणिक शिष्यवृत्या इ. लोकोपकारी कार्ये चालू असतात. वालचंद उद्योगसमूहाच्या ‘वालचंद स्मारक न्यासा’तर्फे सांगलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला भरघोस आर्थिक साहाय्य मिळाले आहे.

 

खंडनिहाय नोंद शोध

Scroll to top