पान २ - Page 2


Click here for Floating Keyboard Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

बालकांना परिचित व मूर्त वस्तूंचे प्रथम ज्ञान करून द्यावे व नंतर अपरिचित व अमूर्त कल्पनांकडे न्यावे, तसेच बालस्वभावाच्या विकासाशी अध्यापनपद्धती मिळतीजुळती असावी, असे प्रथम त्याने सांगितले. अध्यापन मूर्त करण्यासाठी चित्रमय पुस्तके रचण्याच्या उपक्रम त्याने केला. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रूसो याने. रूसो हा बालककेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना त्याने स्थान दिले. बालकाच्या स्वातंत्र्याचाही तो पुरस्कर्ता होता. रूसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे कार्य पेस्टालोत्सीने केले व त्यांतील उणिवा ओळखून नवी भर घातली. अध्यापनपद्धतीला मानसशास्त्राची बैठक त्याने मिळवून दिली. पेस्टालोत्सीच्याच शाळेत त्याचा सहकारी म्हणून काम करून स्वत:ची अध्यापनपद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ म्हणजे फ्रबेल हा होय. त्याच्या मताप्रमाणे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणे हेच शिक्षकांचे कार्य. म्हणून बालमनाच्या कळ्या फुलविणाऱ्या शिक्षकाला त्याने माळ्याची उपमा दिली व त्या पद्धतीला बालोद्यान असे नाव दिले. अध्यापनात क्रीडाप्रवृत्तीला वाव देऊन भाषा, इतिहास इ. विषय शैशवकुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम इंग्लंडमध्ये कॉल्डवेल कुक याने पुढे केला. त्याने आपल्या पद्धतीला ‘क्रीडापद्धती’ असेच नाव दिले.

 

पूर्वोक्त प्रयोग पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या स्तरांवरच होते. माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवे वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप इंग्लंड, अमेरिका व भारत या देशांतील अध्यापनावर अजूनही आहे. ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत हेर्बार्टने कल्पनांचे साहचर्य यावर विशेष भर दिला आणि त्यातून अध्यपनाचे नवे तंत्र निर्माण केले. पूर्वतयारी उपन्यास, साहचर्य, सामान्यीकरण व उपयोजन या पाच पायऱ्या अथवा पंचपदी हेर्बार्टच्या तंत्रातून त्याच्या शिष्यांनी निर्माण केली. गणित, विज्ञान, भूगोल इत्यादींच्या अभ्यासाला त्या काळात महत्त्व होते. त्या विषयांच्या अध्यापनाला हे तंत्र चटकन लागू पडले व लोकप्रियही झाले. परंतु हेर्बार्टच्या तंत्राला पुढे यांत्रिक व कृत्रिम स्वरूप आले.

 

फ्रबेलच्या बालविकासाचे सूत्र घेऊन बालकांच्या शिक्षणाचा प्रयोगशील दृष्टीने अधिक विचार मारिया माँटेसरी या शिक्षणतज्ञेने केला. द्ररिद्री व मंदबुद्धी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रयोग करून तिने आपली पद्धती शोधून काढली. ‘बालक-मंदिर’ या नावाने तिची संस्था ओळखली जाते. या मंदिरात इंद्रियशिक्षण देणाऱ्या व इतर उपकरणांच्या साहाय्याने मुले स्वप्रयत्नाने बुद्धिविकास साधतात व सामुदायिक जीवनातून सामाजिक विकास व आत्मनियंत्रणाची सवय आत्मसात करतात.

 

अमेरिकेत शब्दनिष्ठ अध्यापनाविरूद्ध टीका बरीच जुनी आहे. शिकवणे म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणे, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणे, सहली काढणे इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला. पण अनुभवनिष्ठ व कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली ती जॉन ड्यूई यांनी. जॉन ड्यूई यांनी शिकागो विद्यापीठाला जोडलेल्या प्राथमिक शाळेत अध्यापनपद्धतीबाबत नवे प्रयोग केले. आपण शिकतो म्हणजे कृतीद्वारा प्रयोग करतो. शिकण्यासाठी काही प्रयोजन वा हेतू लागतो. हे प्रयोजन गरजांतून वा समस्यांतून मिळते. समस्या-उकल हीच खरी शिकण्याची पद्धती, तीतूनच बौद्धिक विकास होतो आणि असे अध्यन समाजात घडत असल्याने सामाजिक विकासही होतो. अनुभवाची देवाणघेवाण ही शिकण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. सध्याच्या परिवर्तनशील जगात व्यक्तीच्या ठिकाणी नव्या परिस्थितीशी सामंजस्य राखण्याचे ज्ञान व कौशल्य आले पाहिजे, अशी ड्यूईची विचासरणी आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून समाजाची अखंड प्रगती साधण्यास आवश्यक अशा पद्धतीचे विवेचन ड्यूईने केले.

 

सामुदायिक जीवनातून व सप्रयोजन-कृतीतून मिळणारा अनुभव म्हणजे शिक्षण, या विचारातूनच किलपॅट्रिक यांची योजना-पद्धती वा प्रकल्प-पद्धती निर्माण झाली. प्रकल्प-पद्धतीचा मुख्य भर विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता, स्वतंत्र विचारशक्ती, जबाबदारीची जाणीव व सहकार्यप्रवृत्ती वाढविण्यावर आहे. विद्यार्थ्यांनी माहितीचे भारे डोक्यात रिचविण्याऐवजी ज्ञानाचा खरा उपयोग करण्यास शिकावे, ही तिच्यात दृष्टी आहे.

 

मेरिकेप्रमाणेच यूरोपमध्येही बालमानसशास्त्रावर आधारित अशा कृतिशील शिक्षणाची चळवळ विसाव्या शतकात सुरू होती.

 

प्राचीन भारतातील अध्यापद्धती अध्ययनविषयाला धरून असल्याने तिच्यात विविधता आढळते. तदनंतरचे मध्ययुग व ब्रिटिश राजवटीपासूनचा आधुनिक काळ, असे पुढचे दोन कालखंड आहेत.

 

प्राचीन काळी वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई. ते ग्रंथ कंठस्थ करण्याची पद्धती होती; पण वेदांगांच्या साहाय्याने वेदमंत्राचा अर्थ व विनियोग समजून घ्यावा लागे. श्रवणाबरोबरच मनन व निदिध्यास यांवरही भर असे. कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम यांसारखे ज्ञानाचे विषयही असत. तक्षशिलानालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नप्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धीचा परिपोष करण्यावर कटाक्ष असे. संस्कृत-प्राकृतातील प्रचंड टीकासाहित्य व भाष्ये हे त्याचे फळ आहे. धनुर्विद्या, आयुर्वेद अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रत्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर होता.

 

ध्ययुगात चिकित्सक अध्ययनाची परंपरा लोपली. पाठांतराने वेदविद्या जिवंत ठेवण्याचीच धडपड करावी लागली. अन्य शास्त्रे व विद्या ग्रंथांतच राहिल्या. सामान्य जनांना लेखन-गणनाचे प्राथमिक शिक्षण तेवढे मूळाक्षरे गिरवून मिळे. त्यात विशिष्ट पद्धती नव्हती. व्यवसायांचे शिक्षण परंपरेने व उमेदवारी करूनच मिळवावे लागे.

 

ब्रिटिश अमदानीत ब्रिटनमधील अध्यापनपद्धतीच येथील शिक्षणात रूजल्या. प्राथमिक स्तरांवर घोकंपट्टीच्या जोडीला वस्तुपाठपद्धती सुरू झाली. माध्यमिक स्तरावर हेर्बार्टची पंचपदी व प्रश्नोत्तरपद्धती यांचा अवलंब झाला. इंग्रजीसारखी परकी भाषा शिकण्यासाठी प्रत्यक्षपद्धती व संवादपद्धती रूढ झाल्या. अलीकडे मूलभूत घटकरचनांवर आधारलेली पद्धती उपयोगात आणली जात आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात फ्रेबेल व माँटेसरी यांचे अनुकरण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांत केवळ पुस्तकी शिक्षण देत व माध्यमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होई. या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नसे. या सर्वांचे दुष्परिणाम टाळून, जीवन जगत असताच जावनाची तयारी करून देणाऱ्या उद्योगमूलक शिक्षणाची कल्पना म. गांधींनी पुढे मांडली. ‘नयी तालिम’, ‘बुनियादी शिक्षा’ अशा नावांनी ती ओळखली जाते. एखादा उत्पादक व्यवसाय—उदा., शेती, सूतकताई—घेऊन त्याभोवती भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इत्यादींचे अध्ययन गरजेप्रमाणे गुंफावयाचे, अशी तिच्यात कल्पना आहे. म्हणजे समवाय (गुंफणे) हे अध्यापनाचे मुख्य सूत्र. त्यामुळे ज्ञानाचे चांगले आकलन होते व त्याचा उपयोग कळतो. हा उद्योग सामुदायिक वातावरणात करावयाचा असल्याने विद्यार्थाचा सामाजिक विकासही त्यात घडून येतो.

 

आजच्या प्राथमिक शाळांतील पद्धती हे अनेक पद्धतींचे एक मिश्रण आहे. प्राथमिक शिक्षणात बालकांची कृतिशीलता, क्रीडाप्रवृत्ती, त्यांच्या गरजा आणि प्रत्यक्ष अनुभव-निरीक्षण यांच्यावर भर देण्याकडे कल आहे. माध्यमिक शिक्षणात हेर्बार्टच्या पंचपदीला प्रश्नोत्तरे, चर्चा, निरीक्षण,

खंडनिहाय नोंद शोध

Scroll to top