मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आंबेडकर, माईसाहेब ( - 28 मे 2003) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या उत्तुंग आणि झंझावती महापुरुषाचे कर्तृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी फुलवले. एका प्रज्ञासूर्याचे तेजोवलय बनलेल्या माईसाहेबांनी त्यांना अतुलनीय श्रध्देने तपस्विनीसारखी साथ दिली.


माईसाहेबांचे म्हणजेच सविता भीमराव आंबेडकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव शारदा कृष्णराव कबीर. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्हयातील डोर्ले. पुण्यातील हुजुरपागा या शाळेतून प्रथम श्रेणीत मॅट्रिक पास झाल्यानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात व फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. इंटर सायन्सला त्या सर्वप्रथम आल्या होत्या. वडलांच्या इच्छेनुसार त्यांनी 1937 मध्ये मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामधून एम. बी. बी. एस. ही पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब हे डॉ. माधवराव मालवणकर यांच्याकडे उपचार घेत असताना त्यांची तेथील फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून शारदाबाईंशी भेट झाली. औषधोपचारासाठी काळजी घेणारी परिचारिका म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यात प्रवेश केलेल्या शारदाबाईंनी पुढे 15 एप्रिल 1948 रोजी त्यांच्याशी लग्न केले आणि आठ वर्षांच्या वैवाहिक जीवनात एका वादळाशी स्वत:ला बांधून घेतले.


बाबासाहेबांच्या ढासळत्या तब्येतीला सांभाळण्यासाठी, भारतीय संविधानाचे काम त्यांच्याकडून पूर्ण व्हावे यासाठी, शारदाबाई मधल्या धन्वंतरीला कठोर व्हावे लागले. औषधोपचाराची पथ्ये पाळण्यासाठी आणि विश्रांतीसाठीचे नियम अमलात आणण्यासाठी त्यांना लोकांच्या भेटी-गाठींबाबत जे कडक धोरण पाळावे लागले, त्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या अनुयायांचा रोष पत्करावा लागला. त्या नाहक बदनाम झाल्या. त्यांना प्रचंड असंतोषाला तोंड द्यावे लागले. इतके की बाबासाहेबांच्या मृत्यूला त्यांनाच जबाबदार ठरविले गेले; आणि माईसाहेब अज्ञातवासात गेल्या. जवळजवळ वीस वर्षांनी त्या परत सार्वजनिक कामात उतरल्या. आंबेडकरी चळवळीशी बांधून घेत नामांतर, रिडल्स सारख्या चळवळीत उल्लेखनिय कामगिरी त्यांनी बजावली. उतारवयातील त्यांची सर्व जबाबदारी त्यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी घेतली. आजी म्हणून त्यांची सर्व काळजी त्यांनी समर्थपणे स्वीकारली. मात्र शेवटी स्मृतिभ्रंशाचा त्यांना जडलेला विकार कोणत्या मानसिक धक्क्यातून उद्भवला हे कोडेच राहिले.


शिकारखाने, नीलिमा

खंड विभागणी

Scroll to top