मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आंबेडकर, रमाबाई (अंदाजे 1898 - 27 मे 1935) : अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अविरत कार्य करणाऱ्या सह्दय सहचारिणी. त्यांचा जन्म दापोलीजवळ वणंदगाव येथे भिकू व रुक्मिणी धुत्रे या गरीब दांपत्यापोटी झाला. त्या पूर्वाश्रमीच्या रामी धुत्रे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बाबासाहेबांशी झाला.


रमाबाई विवाहानंतर लिहिण्या-वाचण्यास शिकल्या. त्यामागे बाबासाहेबांची तळमळ होती. त्या अत्यंत विनम्र स्वभावाच्या आणि कामसूवृत्तीच्या होत्या. वडीलधाऱ्यांचा मान राखून, काटकसरीने संसार करुन उरलेला वेळ अभ्यास व बाबासाहेबांची सेवा करण्यात रमाबाई घालवीत असत.


रमाबाई आणि बाबासाहेब या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. बाबासाहेबांना शिक्षण आणि वाचन या दोन गोष्टींची फार आवड होती. तासन्‌तास ते त्यात गुंतलेले असत. पुढे ते परदेशी गेले. खूप शिकले व आपले ज्ञान वाढवून भारतात परत आले. नंतरचे आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी दलितोध्दारासाठी खर्ची घातले. त्यांना संसाराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसे. पण अशाही परिस्थितीत रमाबाईंनी आपला संसार उत्तमप्रकारे चालविला. त्या बाबासाहेबांच्या कार्यात सतत सोबत असत. त्यांची काळजी घेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याला वेग येत असे.


रमाबाईंनी घराचा उंबरठा ओलांडून समाजकार्य करावे, हा बाबासाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी बाबासाहेबांनी रमाबाईंना तयार केले. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविला. त्यांच्यात अनेक गोष्टी रुजविल्या, म्हणून रमाबाई समाज जागृत करण्याचे काम करु लागल्या. त्यांनी समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याया-अत्याचाराविरुध्द आवाज उठविला. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. चाळी, चौक, खेडी यांमधून त्यांनी सभा घेतल्या. भाषणे दिली व महिलांना जागृत केले. बाबासाहेबांच्या चळवळीतील महिलांच्या वाढत्या सहभागामागे रमाबाईंची मोठी प्रेरणा होती.


रमाबाईंचे आयुष्य खूप कष्टात गेले. दु:ख, कष्ट, कारुण्य, हालअपेष्टा, मानापमान, द्रारिदय सारे त्यांच्या वाटयाला आले. अनुभवांची मोठी पुंजी त्यांच्याकडे जमा होती. स्वत: अपार दु:ख सहन करायचे आणि बाबासाहेबांना त्या दु:खाची जाणीवही न होऊ देता त्यांच्या सुखासाठी जिवापाड प्रयत्न करायचे हा रमाबाईंचा स्वभाव. त्याची प्रचीती अनेकदा बाबासाहेबांना आली. अखेरीस आजारपणामुळे रमाबाईंचे निधन झाले.


अशा सह्दय, सहचारिणीबद्दल आपली भावना व्यक्त करताना बाबासाहेबांनी पाकिस्तान आणि भारताचे विभाजनया आपल्या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत म्हटले आहे की, “जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्याबरोबर दु:ख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्रविरहित काळजीच्या आणि गरजांच्या दिवसातही जिने मला अविरत साथ दिली त्या रमाच्या स्मृतीस गुणग्राहकतेची खूण म्हणून माझी ही कलाकृती मी अर्पण करतो.रमाबाईंच्या व्रतस्थ जीवनाची नोंद इतिहासात ठळकपणे राहील.


वाड, विजया

खंड विभागणी

Scroll to top