मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आमटे, मंदाकिनी (25 एप्रिल 1946) : गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा या दुर्गम भागात तळमळीने कार्य करणाऱ्या सुविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रख्यात समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांच्या स्नुषा.


त्यांच्या जन्म नागपूर येथे कुसुम आणि वसंतराव देशपांडे या सुसंस्कृत दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर येथील धरमपेठ हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. तेथून त्यांनी एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी संपादन केली (1971). त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी त्या विवाहबध्द झाल्या (1972). त्यांनी विवाहानंतर ‘×›ü¯»ÖÖê´ÖÖ इन †ò®ÖêãÖê׿ֵÖÖ’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला (1973).


कुष्ठरोगी व्यक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे कार्य मंदाकिनीताईंनी त्यांची स्नुषा झाल्यावर अत्यंत जवळून पाहिले. त्यावेळी समाजसेवेचा हा वसा आणि समृध्द वारसा त्यांनीही जोपासला. त्यांनी गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा या अत्यंत दुर्गम भागात जाऊन तेथील आदिवासी गोर-गरीब जनतेसाठी तळमळीने कार्य करण्याचा वसा घेतला. तेथील दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा देऊन त्यांचा आरोग्यविषयक विकास साधणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करुन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, तेथील अरण्यात असलेल्या प्राण्यांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आणि या दुर्गम भागातील लोकांमध्ये असलेली अंधश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे असे सामाजिक काम करण्यात त्यांनी स्वत:चे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.


मंदाकिनीताई 1974 पासून महारोगी सेवा समिती, वरोरा अंतर्गत येणाऱ्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. प्रतिवर्षी चाळीस हजार आदिवासी रुग्णांना त्या वैद्यकीय मदत पुरवितात. त्या हे सर्व कार्य पती डॉ. प्रकाश आमटे यांच्या सोबतीने करतात. याशिवाय त्यांनी आंध्रप्रदेशात छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात राहणाऱ्या गौंड जमातींसाठी शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रकल्प राबविले आहेत.

मंदाकिनीताईंच्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पतींसोबत रेमन मॅगसेसे पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, अशोक गोंधीया पुरस्कार, न्यायमूर्ती के. एस. हेगडे महावीर पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार, सहयाद्री नवरत्न पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. फ्रान्सजवळील मोनाको या राज्यांनी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या मंदाकिनीताईंचे कार्य प्रेरणादायी असेच आहे.


कडू, हेमांगी

खंड विभागणी

Scroll to top