मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आमटे, साधना (5 मे 1926): कुष्ठरोग्यांच्या उपचार व पुनर्वसन कार्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या एक थोर समाजसेविका. त्यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या इंदुमती घुले. त्यांनी इंटरपर्यंत शिक्षण घेतले. पुढे 1946 साली त्यांचा विवाह समाजसेवक बाबा आमटे यांच्याशी झाला. त्यावेळी साधनाताईंचे वय अवघे एकोणीस वर्षे होते.


ज्या काळामध्ये कुष्ठरोग्यांची सावलीसुध्दा प्रत्येकाला जीवघेणी वाटायची, त्याकाळामध्ये कुष्ठरोग्यांना मायेने जवळ घेत, त्यांना आधार देण्याचे महत्वपूर्ण कार्य बाबांनी सुरु केले. अशा सामाजिक बांधिलकीच्या सर्वोच्च कार्यामध्ये साधनाताईंचा सहभाग, बाबांच्या या विलक्षण कार्यासाठी सर्वतोपरी दिलेली आहुती साधनाताई एक विलक्षण तपस्विनी असल्याची साक्ष देतात.


साधनाताईंनी बाबांसोबत घेतलेल्या कुष्ठरोग्यांच्या उत्थानाचा वसा अविरत सुरु ठेवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, खडतर प्रवास करीत त्यांनी चंद्रपूर जिल्हयातील सोमनाथ येथे या प्रकल्पाची यशस्वी उभारणी केली. प्रत्येक क्षण मरणासन्न अवस्थेत जगणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करण्याचे एक महान कार्य या तपस्वी व्दयींने केले आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आलेली मरणकळा दूर करुन त्यांचे अंधारमय जीवन प्रकाशमान करुन कुष्ठरोग्यांप्रति असलेली जनसामान्यांची हीन प्रकारची वागणूक बदलवून त्यात परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कामही त्यांनी केले आहे. कुष्ठरोग झालेली व्यक्ती योग्य उपचारांनी बरी होऊ शकते. त्यामुळे त्यांचा तिटकारा न करता मायेची पाखर घातली गेली तर अधिक चांगले होऊ शकते असा समाजपरिवर्तनाचा विचारही त्यांनी आपल्या कार्यातून व्यक्त केला आहे.


साधनाताई बाबांच्या कार्याविषयी कमालीच्या जागरुक आहेत. त्याविषयी त्या म्हणतात की बाबांच्या कुष्ठरोग्यांच्या कार्याच्या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे. वेदनेशी असणारे माणुसकीचे नाते हे एक मानवी मूल्य आहे या नात्याने समाजमन बांधण्याचा एक प्रयत्न आनंदवनात सुरु आहे. त्यांनी सोमनाथ प्रकल्प आणि वरोरा येथील आनंदवन प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांना वाहून घेतले आहे. आनंदवन येथे राहणाऱ्या कुष्ठरोगी स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक सहज भावना जाणून, त्यांच्यावर कुटुंबनियोजनाचे बंधन घालून, त्यांचे विवाह लावून देण्याचे महत्वाचे कार्यही साधनाताईंनी केले आहे.


साधनाताईंचे कार्य हे प्रत्येक पिढीला प्रेरणादायी असेच कार्य आहे. त्यांच्या या कार्यात त्यांची मुले व सुनाही पूर्णत: समरस आहेत. डॉ. विकास व प्रकाश ही दोन मुले तर डॉ. मंदाकिनी व डॉ. भारती हया त्यांच्या सुनाही या कार्यात सहभागी आहेत. या सर्वांचे बाबांच्या कार्यातील योगदान महत्वाचे आहे.


साधनाताईंना दलितमित्र पुरस्कार, मिलेनियम ऍ़वॉर्ड, दिवाळीबेन मेहता पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार, ग. दि. माडगूळकर पुरस्कार, मातोश्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले आहेत.

खंड विभागणी

Scroll to top