मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आमोणकर, किशोरी (10 एप्रिल 1931) : प्रतिभावान गायनशैली असलेल्या प्रज्ञावंत गायिका व पद्यभूषण पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म गोमंतकातील कुर्डी गावात झाला. जन्म गोमंतकातील कुर्डी गावात झाला. किशोरी या अशा भाग्यवान शिष्या आहेत की आईच्या गर्भात असल्यापासून त्यांना गुरुने (आईने) संगीताचे संस्कार दिले. त्यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर यांनी जीवनभर संगीतसाधना केली. त्याचे बाळकडू किशोरी आमोणकरांना लाभले.

 

वयाच्या पाचव्या वर्षी जेव्हा काही समजण्याचे मुलांचे वय असते त्या वयापासून किशोरीताईंच्या कानावर सतत गायन-वादनाचे सूर पडत असत. बाळकृष्णबुवा, प्रभाकर, मोहनराव पालेकर, निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून प्राथमिक सुरांचे काही बंदिशींचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. आईचे बोट धरुन मैफलित जाता-जाता आईच्या मागे तानपुरा घेऊन बसून सूर लावण्यास किशोरीताईंनी केव्हा सुरुवात केली हे समजलेच नाही. त्यांनी आईची जयपूर-अत्रौली घराण्याची गायकी आणि त्यांची स्वतंत्र विचारशैलीही आत्मसात केली. परंतु तसेच हुबेहुब ठशाचे गाणे न गाता रागांवर चिंतनपूर्वक स्वत:चे संस्कार केले. स्वत:ची वेगळी लक्षवेधी शैली निर्माण केली.

 

मुंबईला जयहिंद महाविद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांना चित्रपट संगीताचीही आवड होती. संगीतकार हुस्नलाल यांच्याकडून त्यांनी चित्रपट संगीताचे धडे घेतले. त्या गझल-ठुमरी शिकल्या. अन्वद हुसेन खाँ, अंजनीबाई मालपेकर यांचेही त्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला गंधार, पंचम, षड्ज यांचा नाद सतत झपाटून टाकू लागला. त्यामुळे चाकोरीबध्द गाणे सोडून सतत अभ्यासू वृत्तीने रोगाच्या भावाशी एकरुप होऊन त्या गाण्याचा विचार करु लागल्या. रागदारीतील साचेबध्दपणातून त्यांनी स्वत:ची गायनशैली मुक्त केली, तर जयपूर घराण्याच्या गायकीचा मूळ गाभा तसाच ठेवून स्वतंत्र गायनशैलीचा विचार मांडला. त्यासाठी त्यांनी संस्कृत संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. लोक संगीताच्या अभ्यासासाठी भारतातील विविध प्रांत पालथे घातले. बंदिशी लिहिल्या. जीवनपुरी, खंबावती, भूपश्री इत्यादी रागातील त्यांच्या बंदिशी लोकप्रिय आहेत.

 

घराण्याची बांधीलकी त्या मानतातच, पण त्यापेक्षाही संगीताशी त्यांची बांधीलकी त्या निष्ठेने मानतात. “राग म्हणजे भावनांचे प्रकटीकरण असते ते प्रकटीकरण करण्यासाठी कलाकाराला वेगळी किमया दाखवावी लागते. कलाकाराने त्यासाठी जे चिंतन केलेले असते ते महत्वाचे.” असे किशोरीताई म्हणतात.

 

किशोरीताईंना 1969 साली काही काळ आवाजाची समस्या निर्माण झाली होती. त्यांना गाताना त्रास होऊ लागला, पण त्या हतबल झाल्या नाहीत, उदास झाल्या नाहीत. तीव्र मनोबल आणि अध्यात्मिक साधना यायोगे त्यांनी त्यावर मात केली. श्रध्दा आणि स्वत:वर असलेला दृढ विश्वास यामुळे त्या पुन्हा चांगल्या प्रकारे गाऊ लागल्या.

 

अतिशय मधुर आवाज, भावपूर्ण बोल अंग, रागभाव प्रतीत करणारी लय, विलक्षण तल्लीनता, तानांचे विविध प्रकार ही किशोरीताईंची खास शैली आहे. बागेश्री, जौनपुरी, भीमपलास, तोडी या त्यांच्या रागांना श्रोत्यांकडून मनापासून दाद मिळते. शास्त्रीय संगीताप्रमाणेच भावगीत आणि चित्रपट गीतातूनही त्या लोकप्रिय झाल्या. “जाईन विचारीत रानफुला, श्यामसुंदर राजसा ही शांता शेळके यांची रचना किशोरीताईंच्या आवाजामुळे चिरस्मरणीय झाली आहे. ‘गीत गाया पत्थरोने ’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातील त्यांनी गायलेले शीर्षक गीत दाद घेणारे आहे. मीराबाईंच्या रचनेतील ‘मीरा मगन भई’ आणि संत ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित तोचि नादू सुस्वरु जाला हे त्यांनी सादर केलेले कार्यक्रम लोकप्रिय ठरले.

 

किशोरीताईंच्या गायनाला तीन दशकांहून अधिक काळ रसिकांची वाहवा मिळत आहे. देश-विदेशातील त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहेत. 1995 साली किशोरीताईंना न्यूयॉर्क व पॅरिस येथे फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाले होते.

 

त्यांच्या संगीत कार्याचा बहुमान म्हणून पद्मभूषण पुरस्कार, गोवा कला अकादमीचा पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार इत्यादी सन्मान लाभले आहेत.

 

अपसिंगेकर, रजनी

खंड विभागणी

Scroll to top