मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

नारायण मूर्ती, एन्. आर्.: (२० ऑगस्ट १९४६). पुर्ण नाव नागवरा रामराव नारायण मूर्ती. भारतीय उद्योजक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संगणक सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुधा मूर्ती या प्रख्यात लेखिका आहेत.


नारायणमूर्ती यांचा जन्म कर्नाटकमधील म्हैसूर येथे झाला. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग येथून विद्युत् अभियांत्रिकी विषयातील बी. ई. (१९६७) व इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून एम्. टेक. (१९६९) या पदव्या मिळविल्या. त्यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (आय्. आय्. एम्.) अहमदाबाद येथे मुख्य प्रणाली कार्यकर्ता या पदावर कामाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये सॉफ्ट्रॉनिक्स ही कंपनी स्थापन केली परंतु, त्यात अपयश आल्यामुळे ते पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्स (PCS)या कंपनीत रूजू झाले. काही काळानंतर १९८१ मध्ये त्यांनी सहा सहकाऱ्यांबरोबर मुंबईत इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. त्यावेळेस कंपनीला सुधा मूर्ती यांनी प्रथम रू. १०.०००/-भांडवल दिले. या कंपनीने अल्पकाळातच बंगलोर, पुणे, चेन्नई वगैरे मोठ्या शहरांतून आपल्या शाखा सुरू केल्या. मुंबई येथे एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेले त्यांचे कार्य आज जगभर प्रसिद्ध आहे. १९९१ मध्ये या कंपनीचे रूपांतर इन्फोसिस पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झाले. लवकरच या कंपनीस गुणवत्तेचे प्रतीक SEI-CMM मिळाले. १९९९ मध्ये अमेरिकी शेअर बाजार NASDAQ(नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज् डीलरस् ऑटोमेटेड कोटेशन) म्ध्ये इन्फोसिस कंपनीच्या भागांची (शेअर्सची) नोंदणी करण्यात आली. हा इतिहास रचणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी आहे.


नारायम मूर्ती १९८१ -२००२ या कालावधीत इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकरी अधिकारी होते. २००२ मध्ये त्यांनी आपली ही जबाबदारी त्यांचे सहकारी नंदन निलकेनी यांच्याकडे सोपविली.


यानंतर ते २००२-११ या दरम्यान इन्फोसिसचे अध्यक्ष होते. अध्यक्ष पदावरून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर ते सध्या इन्फोसिस कंपनीचे गुणश्री अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.


न्फोसिस कंपनीत काम करीत असताना त्यांनी जागतिक वितरण प्रतिरूप हा आराखडा तयार करून तो प्रत्यक्षात अमलात अणण्याचे महत्तवपूर्ण काम केले. त्यामुळे भारतातून आय. टी. (माहिती आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातील सेव बाहेरील देशांना पुरविण्याचा पाया रचला गेला. आज भारतातील आय. टी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. आय. टी. क्षेत्रात जो आमूलाग्र बदल घडून आला आहे, त्याचे श्रेय नारायण मूर्ती यांनाच जाते. अमेरिकेत इतर भारतीय कंपन्यांच्या मानाने इन्फोसिस या कंपनीशी व्यापारासाठी सर्वांत प्रथम ठराव केले गेले. सध्या या कंपनीची निव्वळ नफा १.४ अब्ज डॉलर इतका आहे (२०१२). नारायण मूर्ती यांनी शून्यातून जग निर्माण केले. यामध्ये त्यांना जे काही लाभले त्याच्यावर ते स्वत:चा मालकी हक्क मानत नाहीत, तर त्या संपत्तीचा स्वत:ला विश्वस्त समजतात. महात्मा गांधी यांच्या विचारातून त्यांना ही प्रेरणा मिळाली.


नारायण मूर्ती यांचे ए बेटर इंडिया, एबेटर वर्ल्ड  हे पुस्तक प्रसिद्ध आहे (२००९).नारायण मूर्ती आय्. आय्. एम्. चे अध्यक्ष होते (२००२-०७). तसेच ते दावोस येथील जागतिक आर्थिक सत्रामध्ये सहभागी झाले होते (२००५). ते भारतातील सार्वजनिक आरोग्य संस्थेचे अध्यक्ष, ब्रिटिश दूरसंचार विभागाच्या एशिया पॅसिफिक सल्लागार मंडळाचे सदस्य, इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो व द यू. एस्. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंग याचे परदेशी सदस्य आहेत. याखेरीज अनेक नामवंत संस्था व बँका यांचे ते संचालक आहेत. ते अनेक ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना आय. टी. क्षेत्राबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन करीत असतात. याशिवाय अनेक सामाजिक संस्था स्थापन करून त्याद्वारे समाजसेवा करण्याचे महान कार्य ते करीत आहेत.


नारायण मूर्ती यांना पद्मश्री (२००२) व पद्मभूषण (२००८) या पुस्तकारांनी गौरविण्यात आले. आंत्रप्रनर ऑफ द इयर हा ॲवॉर्ड मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत (२००३). तसेच त्यांना फोरच्युन मासिकाचा एशियाज् बिझनेसमन ऑफ द इयर (२००२ व फोरच्युन्स १२ ग्रेटेस्ट आंत्रप्रनर ऑफ अवर टाइम (२०१२), फ्रान्स शासनाचा ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर (२००८), फोर्बज् लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड (२०११), जेम्स सी. मॉरगन ग्लोबल ह्यूमॅनीटेरिअन ॲवॉर्ड (२०१२), अर्न्स्ट वेबर  मेडल (२००७), हूवर मेडल (२०१२), इ. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.


भारस्कर, शिल्पा चं.

खंड विभागणी

Scroll to top