मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

तेंडुलकर, सचिन रमेश : (२४ एप्रिल १९७३) भारतातील विश्वविख्यात क्रिकेटपटू. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. ‘मास्टर ब्लास्टर’ या नावाने ओळखला जाणारा सचिन आक्रमक, तडाखेबाज, फलंदाज आहे. जन्म मुबंई येथे, समीक्षक व कवी रमेश आणि विमानक्षेत्रात कार्य करणाऱ्या रजनी या दांपत्यापोटी. त्यास नितीन आणि अजित हे दोन थोरले भाऊ असून सविता ही बहीण आहे. सचिनचे शिक्षण मुंबईतील शारदाश्रम विद्यालयात झाले. लहान वयातच सचिनची क्रिकेटमधील प्रगती पाहून त्याचा भाऊ अजित तेंडुलकर याने त्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्यास प्रशिक्षण दिले. त्यांमधून सचिनचा क्रिकेट कारकिर्दीचा पाया रचला गेला.


चिन सुरूवातीपासून जड बॅट वापरीत आहे. चेंडूचा वेग आणि उसळता चेंडू यांचा नेमका वेध घेऊन गोलंदजाशी तो सामोरा जातो. आक्रमकता आणि बचाव यांचे तंत्र साधलेला तो फलंदाज असून त्याने गोलंदाजीनुसार कौशल्य आत्मसात केले आहे. अल्पावधीतच सचिनने शालेय क्रिकेट संघात धावांचे डोंगर रचून पुढे व्यावसायिक संघात स्थान मिळविले. चौदाव्या वर्षी सचिनची रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झाली होती (१९८७).१९८८ मध्ये चषक स्पर्धेत शारदाश्रम विद्यालयाकडून खेळताना सचिनने वैयक्तिक नाबाद ३२८ धावा करून विनोद कांबळी समवेत ६६४ धावांची नाबाद विश्वविक्रमी भागीदारी केली. पुढे रणजी करंडक सामन्यात मुंबई संघाकडून गुजरातविरूद्ध त्याने पदार्पणातच शतक केले. या सर्व कामगिरीच्या जोरावर सचिनची पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सचिनने वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि एकदिवसीय सामन्यातही पदार्पण केले. 


इंग्लंड विरूद्ध ऑगस्ट १९९० मध्ये सचिनने कसोटी क्रिकेटमधले आपले शतक साजरे केले. १९९१-९२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मर्व्ह ह्युजेस, ब्रुस रीड, क्रेग मॅकडरमॉट या वेगवान गोलंदाजांचा सामना करीत सचिनने दोन शतकी खेळ्या साकारून अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रारंभी सचिन मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने पहिले शतक १९९४ मध्ये काढले. १९९४ च्या काळात ५० धावांच्या सरासरीने सचिनने धावा केल्या. पाकिस्तान, श्रीलंका, वेस्टइंडिज या संघांतील जागतिक किर्तीच्या गोलंदाजांना त्याने जोरदार प्रत्युत्तर देऊन भारतीय संघास विजय मिळवून दिले. १९९८ च्या एका वर्षात तर सचिनने विक्रमी ८ शतके केली. शारजा येथे ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना सलग तीन शतके साकारून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, जैसन गॅलेस्पी या गोलंदाजांना नामोहरम केले. १९९६ साली सचिनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद आले, त्याच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम आला. परिणामत: भारतास पराभवास सामोरे जावे लागले.२००० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी घेऊन सचिनने कर्णधारपद सोडले. २००० नंतरही सचिनच्या फलंदाजाची लय अद्याप कायम आहे. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना ३१ मार्च रोजी १३९ धावांची शतकी खेळी करून सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात १०,००० धावा करण्याचा विक्रम केला. सलग सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये (१९९२,१९९६,१९९९,२००३,२००७,२०११) सचिन खेळला असून त्यांत त्याने विक्रमी कामगिरी केली आहे.२००३ च्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत सचिनने एकूण ६७३ विश्वविक्रमी धावा करून मालिकावीराचा पुरस्कारही पटकाविला होता. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला, त्यात गोलंदाजी, फलंदाजी तसेच संघास प्रेरणा आणि मार्गदर्शन या सर्वांत सचिनचा मोठा वाटा होता. एकदिवसीय सामन्यातील द्विशतकी खेळी सचिनने पहिल्या प्रथम दक्षिण-आफ्रिकेसारख्या बलाढ्या संघाविरूद्ध साकारली. एकदिवसीय सामन्यांत आजमितीस ४९ शतके काढणारा सचिन १८००० पेक्षा जास्त धावा काढणारा जगातला एकमेव फलंदाज आहे.


याच्या एकोणिसाव्या वर्षी कसोटी सामन्यांत १००० धावा काढणारा तो एकमेव फलंदाज आहे. २३ ऑगस्ट २००२ मध्ये इंग्लंडविरूद्ध शतकी खेळी करून सचिनने डॉन बॅडमॅनचा २९ शतकांचा विक्रम मोडीत काढला. २००५ मध्ये श्रीलंकेविरूद्ध १०९ धावा काढून सचिनने कसोटी सामन्यांत सर्वाधिक शतके केली व सुनील गावसकरांचा ३४ शतकांचा विश्वविक्रम मोडला. डिसेंबर २०१२ पर्यंत ५१ शतके झळकावून कसोटींत १६,००० पेक्षा जास्त धावा करणारा सचिन हाच जागतिक स्तरावरील एकमेव क्रिकेटपटू आहे. फलंदाजातील आपल्या सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर क्रिकेटच्या इतिहासामध्ये अविस्मरणीय ठरलेले शंभरावे शतक सचिनने २०११ मध्ये बांगलादेशाविरूद्ध साकार केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या फलंदाजीच्या नामांकनामध्ये सचिनला अनेक वेळा पहिले नामांकन मिळाले आहे. सचिन संघास आवश्यक तेव्हा गोलंदाजीही करतो. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये १५४ विकेट्स मिळविल्या आहेत. प्रत्येक नव्या सामन्यागणिक नवनवे  विश्वविक्रम सचिनच्या नावावर जमा होत आले आहेत. डिसेंबर १०१२ अखेर सचिनने शेकडो विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (१८४२६); कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा; कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ५१ आणि ४९ मिळून सर्वाधिक शंभर शतकांचा विश्वविक्रम; दोन्ही प्रकारांत सर्वाधिक अर्धशतके, सर्वाधिक वेळा सामनांवीर (५९) आणि मालिकावीर (१४); विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा (२२५८), सर्वाधिक शतके (६) सर्वाधिक अर्धशतके, एका वर्षात सर्वाधिक धावा (१,८९४-१९९८), एका वर्षात सर्वाधिक धावा (९-१९९८) सर्वाधिक सामन्यांमधून खेळण्याचा तसेच सर्वाधिक कालावधीसाठी खेळण्याचा विक्रम, अशा काही विक्रमांचा प्रतिनिधिक उल्लेख करता येईल.


चिनच्या अतुलनीय क्रिकेट खेळाचा सन्मान म्हणून त्यास अनेक पुरस्कार लाभले आहेत; अर्जुन पुरस्कार (१९९८); ‘विस्डेन’ या संस्थेचे अग्रमानांकित पुरस्कार (तीन वेळा १९९७,२०१२,२०१२); ‘आय्. सी. सी.’ या संस्थेचा ‘सर गॅरी सोबर्स ट्रॉफी फॉर द क्रिकेटर ऑफ द ईयर’ (२०१०);कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द ईयर (२०११), बी.सी.सी.आय्. क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड (२०११) इत्यादी. याशिवाय भारत सरकारचे पद्मश्री (१९९९), पद्मविभूषण (२००८), महाराष्ट्र शासनाचां महाराष्ट्र भूषण (२००१) इ. नागरी पुरस्कारही त्यास मिळाले आहेत. भारतीय वायुसेनेने सचिनला मानद ग्रूप कॅप्टनची पदवी दिली आहे.


म्हैसूर विद्यापीठाने त्यास ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल केली असून, ऑस्ट्रेलिया सरकारने सचिनला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (२०१२) ही बहुमानाची उपाधी देऊन गौरविले आहे. भारतातील अनेक स्टेडियममधील प्रेक्षागृहांना नाव देण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी एप्रिल २०१२ मध्ये सचिनला भारतीय संसदेच्या राज्यसभेत नामयुक्त केले आहे. १९९५ मध्ये अंजली मेहता या डॉक्टर युवतीशी सचिनचा विवाह झाला असून त्यांना सारा आणि अर्जुन ही दोन अपत्य आहेत. आजही वयाच्या ३९ व्या वर्षी कार्यरत सचिन भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान देत आहे.


भटकर, जगतानंद बा.

खंड विभागणी

Scroll to top