मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

पाटील, ज्ञानदेव यशवंतराव : (२२ ऑक्टोबर १९३५).


महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ व बिहार राज्याचे राज्यपाल. डी. वाय्. पाटील या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे यशवंतराव व वत्सलाबाई या दांपत्यापोटी झाला. त्यांनी एम्. ए., एल्एल्. बी., पीएच्. डी. या पदव्या शिवाजी विद्यापीठातून संपादन केल्या.


विद्यार्थिदशेतच ते सामाजिक कार्याकडे आकृष्ट झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्रीराम को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे ते अध्यक्ष झाले (१९५५-५९). त्यानंतर कोल्हापूर नगरपरिषदेचे एकमेव काँग्रेस नगरसेवक म्हणून ते निवडून आले (१९५७-१९६२). तसेच कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे अध्यक्ष, कसबा बावडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, मौनी विद्यापीठ समितीचे (गारगोटी) अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते (१९६७-१९७८). डॉ. डी. वाय्. पाटील प्रतिष्ठान, डॉ. डी. वाय्. पाटील एज्युकेशन सोसायटी, रामराव आदिक एज्युकेशन सोसायटी, काँटिनेंटल मेडिकेअर फौंडेशन अशा बहुविध संस्था स्थापन करून या संस्थांमधून त्यांनी प्राथमिक ते महाविद्यालयीन, कृषी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाची सोय केली. या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थांचा विस्तार मुंबईसह प्रमुख शहरांतून झाला आहे. डॉ. डी. वाय्. पाटील को-ऑपरेटिव्ह बँकेचे (२००८) ते संस्थापक असून महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थाचे ते विश्वस्त व सन्माननीय सदस्य आहेत. त्यांच्या मते, जीवनातील आव्हानांना तोंड देता येईल असा शिक्षणाचा आकृतिबंध असला पाहिजे, तसेच भारतीय संस्कृती व तिचे सत्त्व यांचे संवर्धन शैक्षणिक मूल्यांतून झाले पाहिजे.


त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची निवड झाली (२१ नोव्हेंबर २००९). शासकीय वेतन नाकारून दरमहा केवळ एक रुपया मानधनावर ते राज्यपाल पदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून ईशान्य भारताबरोबरच शेजारील देशांनाही शैक्षणि सुविधा देण्यासाठी त्रिपुरा एक एज्युकेशनल हब म्हणून नावारुपास येत आहे. ते कुस्ती व क्रिकेटचे शौकीन असून त्यांच्या नावे नव्या मुंबईत सर्व सोयींनी सुसज्ज क्रीडांगण बांधण्यात आले आहे. २२ मार्च २०१३ रोजी त्यांची बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.


त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्त्वाचा गौरव भारत सरकारने पद्मश्री, आणि नॉटिंग्हॅम विद्यापीठाने (ग्रेट ब्रिटन) सामान्य डॉक्टरेट देऊन केला आहे. याशिवाय पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेचे मानपत्र (१९९२), कोल्हापूर महानगरपालिकेचा समाजश्री पुरस्कार (२०००), प्रेदश काँग्रेस कमिटी (मुंबई) यांचा राजीव गांधी पुरस्कार (२००७) आदि सन्मान त्यांना लाभले आहेत.


मिठारी, सरोजकुमार

खंड विभागणी

Scroll to top