मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

कुरुंदकर, नरहर अंबादास : (१५ जुलै १९३२१० फेब्रुवारी १९८२). थोर विचारवंत, लेखक, समीक्षक नामवंत वक्ते. जन्म वसमत (जि. परभणी) येथे. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमत येथे आणि इंटर सायन्सपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सिटी कॉलेज, हैदराबाद येथे झाले. ते नोकरीनिमित्त नांदेड येथे आल्यानंतर बी.ए. (१९६१) आणि एम्.ए. (१९६३) या परीक्षा बहि:स्थ विद्यार्थी म्हणून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून उत्तीर्ण झाले. हैदराबादच्या निजामी संस्थानाच्या राजवटीतील मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात (१९३८) कुरुंदकरांच्या आईवडिलांनी भाग घेतला. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याची पत्रके वाटणे, संबंधितांना बातम्या पोचविणे इ. स्वरूपाची कामे ते वयाच्या बाराव्या वर्षापासून करू लागले. १९४८ मध्ये कम्युनिस्ट म्हणून त्यांना तुरुंगवास झाला होता. नांदेड येथील प्रतिभानिकेतन हायस्कूल येथे (१९५५-६३) तसेच जुलै १९६३ पासून पिपल्स कॉलेज नांदेड येथे त्यांनी मराठीच्या अध्यापनास सुरुवात केली आणि पुढे ते कॉलेजचे प्राचार्यही झाले (१९७७).

मराठीतील व्यासंगी प्राध्यापक डॉ. ना. गो. नांदापूरकर हे कुरुंदकरांचे मामा होत. त्यांच्याकडे हैदराबाद येथे बालपणी राहून शिक्षण घेतल्याने त्यांच्या व्यासंगी बौद्धिक परिश्रम घेण्याच्या वृत्तीचे संस्कार अतिशय लहान वयातच कुरुंदकरांवर झाले. ह्याच काळात मामांच्या सहवासात महाभारताचेही त्यांचे वाचन झाले. भालचंद्र महाराज कहाळेकर ह्यांना कुरुंदकर गुरुस्थानी मानत. त्यांच्याकडून त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन लाभले. चिंतनपरता हा कुरुंदकरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा विशेष मानावा लागेल. ते इहवादी (सेक्यूलॅरिझम) विचारप्रणालीचे भोक्ते होते आणि कट्टर हिंदूत्वविरोधीही होते.


हाराष्ट्रातील सर्व प्रमुख व्याख्यानमालांमध्ये वक्ता म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अफाट स्मरणशक्ती, तसेच कुठल्याही प्रश्नाची ऐतिहासिक सम्यक पार्श्वभूमी स्वरूप लक्षात घेऊन मांडणी करण्याची हातोटी आणि तल्लख विश्लेषण शक्तीच्या जोरावर त्या प्रश्नाचा वर्तमानाशी असलेला सांधा पुरेसा स्पष्ट करण्याची क्षमता यांमुळे त्यांची व्याख्याने संस्मरणीय ठरत. तसेच त्यांच्या या शैलीविशेषामुळे आणि तर्कसंगत मांडणीमुळे श्रोते प्रभावित मंत्रमुग्ध होत असत. व्याख्यानाच्या ओघात उदाहरणादाखल अतिशय चपखल अशा गोष्टी सांगणे आणि आवश्यकतेनुरूप विलक्षण धारदार औपरोधिक विनोदाची पखरण करणे, ह्यांमुळे त्यांची व्याख्याने रंगतदार होत असत. आणीबाणीच्या काळात इसापनीतीतल्या गोष्टींसारखा व्याख्यानविषय निवडून रूपकाश्रयी निवेदनशैलीद्वारा वर्तमानातल्या जुलमी राजवटीचे प्रतिपादन ते कौशल्याने करीत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतवंदेमातरम्ह्या गीताला विरोध  झाल्यानंतर नांदेड येथे ह्याच विषयावर त्यांनी दिलेले व्याख्यान ऐतिहासिक स्वरूपाचे अविस्मरणीय होते. दलितांच्या राखीव जागांचे ते खंदे समर्थक होते. मंडल आयोगानंतर गुजरात राज्यात उठलेल्या आरक्षणविरोधी वादळास समर्थपणे उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने दिली. नामांतर चळवळीत विरोधकाची भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी मंडळींकडून त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली. राष्ट्रसेवादल, साधना परिवार, बाबा आमटे ह्यांचे आनंदवन, मराठवाडा साहित्य परिषद दै. मराठवाडा, नांदेड एज्युकेशन सोसायटी, प्रतिभानिकेतन शिक्षणसंस्था इ. सार्वजनिक संस्थांचे ते सक्रिय सभासद होते. नांदेड शहरातील आणि मराठवाड्यातील सर्वच सांस्कृतिक उपक्रमांना त्यांचे भक्कम पाठबळ होते. त्यांचा बराचसा वेळ या सार्वजनिक संस्थांच्या निरनिराळ्या उपक्रमांत गुंतून पडलेला असे. त्यांच्या लेखनामागची एक प्रेरणा या सार्वजनिक संस्थांच्या विकासाला योग्य गती मिळावी हीही होती.


रंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद ह्या संस्थेचे ते काही काळ अध्यक्ष होते. त्यांना महाराष्ट्र राज्याचाआदर्श शिक्षकहा पुरस्कार प्राप्त झाला (१९७८). रूपवेध, शिवरात्र, धार आणि काठ ह्या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय पुरस्कार लाभले. आकाशवाणी सल्लागार मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठवाडा विद्यापीठ सिनेट इ. संस्थांचे ते सदस्य होते. बडोदा वाङ्मय परिषदेचे अधिवेशन (१९७८), मराठवाडा विभागीय ग्रंथसंमेलन, पूर्णा (१९८०), सोमनाथ वरोडा मराठी साहित्य संमेलन (१९८२), मराठवाडा इतिहास परिषद अधिवेशन, पैठण (१९८२) इत्यादींचे ते उद्घाटक होते. तर मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन (१९७८), बडोदा वाङ्मय परिषद संमेलन (१९७९) आणि महाराष्ट्र इतिहास परिषद अधिवेशन, धुळे (१९८०) ह्या संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली.


प्रतिष्ठानच्या डिसेंबर १९५३ च्या अंकात त्यांचा पहिला लेख ( न. शे. पोहनेरकरांच्या विरलेल्या गारा चे परीक्षण) प्रसिद्ध झाला. नंतरच्या काळात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्मयीन, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील नानाविध विषयांवर प्रश्नांवर विपुल लिखाण केले. इतिहास, धर्म, प्राचीन संस्कृती, कला, समाजशास्त्र, भाषा शास्त्र इ. विषयांतील त्यांच्या प्रगाढ व्यासंगाचा विद्वत्तेचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो. रूपवेध (१९६४), मागोवा (१९६७), जागर (१९६९), शिवरात्र (१९७२), धार आणि काठ (१९७१), पायवाट (१९७४), छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य (१९७७), यात्रा (१९७७), ओळख (१९७८), छायाप्रकाश (१९७९) आणि भजन (१९८०) ही त्यांच्या हयातीत प्रसिद्ध  झालेली पुस्तके होत. मनुस्मृती : एक विचार, आकलन, रंगशाळा, अभयारण्य, अन्वय, वारसा, अभिवादन, परिचय, रंगविमर्श, त्रिवेणी इ. पुस्तके त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाली. त्यांनी सुमारे आठ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. खास तरुण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाटा माझ्या तुझ्या हे प्रश्नोत्तररूपी पुस्तक लिहून त्यात अनेक संकल्पनांचे सुबोध विवेचन केले आहे. सुलोचना देशमुखांनी कुरुंदकरांचा जो पत्रव्यवहार प्रसिद्ध केला आहे (नरहर कुरूंदकरांची निवडक पत्रे) त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक विचारवंत या नात्याने अंतरंग उलगडत जाते; वाटचाल या त्यांच्या पुस्तकातील लेखांवरून त्यांची बरीचशी चरित्रविषयक माहिती मिळू शकते. रंगशाळा हा भारतीय काव्यशास्त्राची मांडणी करणारा एक महत्त्वाकांक्षी ग्रंथ आपल्या हातून सिद्ध व्हावा, ही त्यांची तीव्र इच्छा होती; पण हा ग्रंथ अपुरा राहिला असून त्याच अवस्थेत तो प्रसिद्ध झालेला आहे.


भगत, दत्ता 

खंड विभागणी

Scroll to top