मराठी विश्वकोश : अद्ययावत माहिती


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

चव्हाण, अशोक शंकरराव : (२८ ऑक्टोबर १९५८). महाराष्ट्र राज्याचे २५ वे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय काँग्रेसचे एक तडफदार नेते. त्यांचा जन्म मुंबई येथे राजकीय परंपरा असणाऱ्या कुटुंबात शंकरराव कुसुमताई या दांपत्यापोटी झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील शंकरराव एक लढवय्ये कार्यकर्ते होते. पुढे त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून धुरा वाहिली. अशोकरावांनी बी. एस्‌सी., एम्. बी. ए. या पदव्या संपादन केल्या.


 

त्यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस, नांदेड महानगरपालिका येथून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. पुढे त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली. ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले (१९८७-८८). त्यानंतर ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले (१९९२). काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृह ही खाती सांभाळली (१९९९-२००४). पुढे परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य, खनिकर्म, उद्योग (२००४-२००९) या खात्यांचे मंत्री म्हणूनही विधायक कार्य केले. उद्योग मंत्री असताना त्यांनी राज्यात उद्योगधंदे विमानतळ यांच्या विकासास चालना दिली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर (२००८) मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जागी अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली ( डिसेंबर २००८). या काळात त्यांनी आघाडी शासन असूनही लोकाभिमुख अनेक कामे केली. पुढे २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी निवड केली ( नोव्हेंबर २००९). वडिलांप्रमाणेच राज्याच्या राजकारणात दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी त्यांनी मिळाली. मात्र मुंबईच्या कुलाब्यातील आदर्श हाउसिंग सोसायटीच्या वादग्रस्त प्रकरणामुळे त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (नोव्हेंबर २०१०). नुकत्याच झालेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले (२०१२).


त्यांच्या पत्नीचे नाव अमिता असून त्यांना दोन सुविद्य मुली आहेत.

मिठारी, सरोजकुमार 

खंड विभागणी

Scroll to top