पाटील, प्रतिभाताई (19 डिसेंबर 1934)


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

पाटील, प्रतिभाताई (19 डिसेंबर 1934) : भारतीय प्रजासत्ताकाच्या बाराव्या आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, कुशल संघटक, प्रभावी प्रशासक, कुटुंबवत्सल गृहिणी असे एक विविधांगी प्रगल्भ व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म जळगाव, खानदेश येथील एका सुसंस्कृत आणि श्रीमंत कुटुंबात झाला. वडील नारायणराव उपाख्य नानासाहेब पाटील हे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ. आई राजकुँवर या गृहिणी. प्रतिभाताई पाच भावांची एकुलती एक लाडकी बहीण. त्यांचे बरेचसे बालपण बोदवड तालुक्यातील नाडगाव या लहानशा खेडेगावी गेले. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात झाले. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी सन 1962 मध्ये पुणे विद्यापीठाची एम. ए. ही पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आणि महाविद्यालयाचा ‘ब्युटी क्कीन’ हा किताबही त्यांनी पटकावला आहे.


ताईंनी एकदा चाळीसगाव येथील क्षत्रिय महासभेच्या महिला मेळाव्यामध्ये अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित तत्कालीन आमदार सोनूसिंह अण्णा पाटील व भानुप्रतापसिंह हे दोघेही अत्यंत प्रभावित झाले. तेव्हा त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा आग्रह करण्यात आला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ताईंना जळगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी दिली. त्या 1962 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. आमदार असतानाच त्यांनी मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1965 मध्ये तेथून एलएल.बी ही पदवी संपादन केली. त्यानंतर न्यायालयात त्यांनी एक खटला दाखल केला व त्यात विजय संपादन केला. त्याच कालावधीत त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. पुढे त्यांचा विवाह अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. देवीसिंह शेखावत यांच्याशी 7 जुलै 1965 रोजी झाला. त्यांना राजेंद्र उपाख्य रावसाहेब हा पुत्र व ज्योती राठौर ही कन्या अशी दोन अपत्ये आहेत.


त्यांनी 1962, 1967, 1972, 1978 आणि 1980 अशा एकूण पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी 1967 ते 1978 आणि 1982 ते 1985 या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, दारुबंदी, संसदीय कार्य, समाजकल्याण, गृहनिर्माण, नगरविकास, शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अशा विविध विभागाच्या मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. 1979-80 या कालावधीत त्या काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. त्या 1986-88 मध्ये राज्यसभेच्या उपसभापती व 1988-90 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. 1991 मध्ये त्यांनी अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून विजयी निवडणूक लढवून 1996 पर्यंत अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी अनेक देशांचे यशस्वी दौरेही केले आहेत. त्यानंतर मात्र 1997-2004 या कालावधीत त्या आपल्या कुटुंबात आणि सामाजिक कार्यात रममाण झाल्या.


त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षकार्यात दिलेले त्यांचे योगदान मोठे आहे. म्हणूनच त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली. त्यांनी 8 नोव्हेंबर 2004 रोजी राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली. या सर्व पदांवरुन त्यांनी राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, तसेच ते अंमलातही आणेल. 21 जून 2007 पर्यंत त्यांनी ही वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण केली.


त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा वयाच्या 73 व्या वर्षी घटनात्मकदृष्टया सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान झाला आणि 25 जुलै 2007 रोजी त्यांचा भारतीय प्रजासत्ताकाच्या बाराव्या व भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथविधी झाला. त्यांचा हा गौरव म्हणजे महाराष्ट्र कन्येचा सन्मानच होय.


सोसे, आतिश

खंड विभागणी

Scroll to top