आमटे, ताई ( 1910 - 8 मार्च 1994)


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

आमटे, ताई ( 1910 - 8 मार्च 1994) : थोर समाजसेविका. कोकणात आंजर्ले (रत्नागिरी) जन्म झाल्यामुळे कोकणचा सदैव उत्साही, टवटवीत असा बाणा त्यांनी घेतला होता. लोकमान्य टिळक हे त्यांच्या वडलांचे मामा त्यामुळे ताईंना लोकमान्यांच्या घरी राहण्याचं भाग्यही मिळालं. त्यामुळे लोकमान्यांपासून राष्ट्रकार्याची स्फूर्तीसुध्दा मिळाली.


1925 मध्ये त्यांचा वि. गो. तथा विनायकराव आपटे यांच्याशी विवाह झाला. ते पुण्यातील प्रसिध्द विधिज्ञ (वकील) आणि संघ कार्यकर्ते होते. त्यामुळे घरी माणसांचा राबता असे. त्यांच्या घरी लहान-मोठे, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, सर्व जाती-जमाती यांचा प्रवेश थेट घरापर्यंत असे. त्यामुळे सगळे भेदाभेद नष्ट झाले. सारा समाज आपला आहे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे विचार ताईंच्या मनात ठाम झाले. घरी येणाऱ्या मोठया लोकांचे, नेत्यांचे ताई निरीक्षण करीत आणि त्यांचे कोणते गुण घेता येतील यांचा त्या मनोमन विचार करीत असत.


संकटे आणि अडचणी पाचवीलात पुजलेल्या असत. 1948 मध्ये गांधी हत्येनंतर हजारो घरे जाळण्यात आली. त्यातच ताईंचा वाडा पेटला. तेव्हा लहान मुलांसह ताई मांडके वाडयात आल्या असताना तेथेही जमाव आला आणि दगडफेक होऊ लागली. आपल्यासाठी कुणाला त्रास नको म्हणून त्यांनी घर सोडलं. परंतु ताईंच्या खूप ओळखीमुळे त्यांची सोय झाली. त्यांनी सर्व संकटे हसत हसत सोसली. ज्यांनी घर जाळले त्यांच्याविषयी कधी मनात कटुता धारणा केली नाही. हे आमचेच लोक आहेत असे त्या म्हणत. त्यावेही स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रचार नसतानाही विवाहानंतर त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत यांचा चांगला अभ्यास केला. लहानपणापासूनच त्यांना संघटनेची अतिशय आवङ मुलींची एक संघटना उभारावी असे त्यांच्या मनात येई. कारण संघटनेतच बळ असते. त्यानुसार त्यांनी संघटनेला प्रारंभही केला. कराडच्या इंदिराबाई दिवेकर आणि सोलापूरच्या काशीताई कुलकर्णी सहाय्याला आल्या. त्यांनी मुलींची शिबिरे, सहली, अभ्यासवर्ग, बैठका, साहसी खेळ, संरक्षणाविषयी कार्यक्रम, व्यायाम आदी अनेक उपक्रम केले. संघटन चांगले मोठे झाले, पण त्यांना असे कळले की, वर्धा येथे लक्ष्मीबाई पुरुषोत्तम तथा मावशी केळकर यांची मुलींची अशीच शाखा 25 ऑक्टोबर 1936 (विजयादशमी) या दिवशी चालू केलेली आहे. हे ऐकून त्यांनी आपल्या पुण्याची शाखा मोठया अंत:करणाने राष्ट्रसेविका समितीमध्ये विलीन केली आणि एका नेतृत्व करणाऱ्या ताई मावशींच्या अनुयायी झाल्या.


1967 मध्ये त्यांचे पती विनायकराव आपटे यांचे निधन झाले. पती निधनाचे दु:ख विसरुन त्यांनी पुन्हा कार्याला प्रारंभ केला. 1968 मध्ये त्यांनी राष्ट्रसेविका समितीचे पहिले अधिवेशन भारतीय अधिवेशन पुण्यामध्ये आयोजित केले. महिलांना संसार सांभाळून सामाजिक कार्य करणे अतिशय कठीण असते पण हे अधिवेशन त्यांनी अत्यंत यशस्वी करुन दाखविले आणि आपल्यामधील नेतृत्व गुणांचा परिचय करुन दिला.


त्यांच्या समाजसेवेची दोन उदाहरणे म्हणजे 1961 मध्ये पुण्यात पानशेतचा प्रलय घडला. हजारो लोक निराधार झाले. अशा वेळी ताई पुरग्रस्तांसाठी धावून आल्या. पूरग्रस्तांसाठी कपडे जमा करणे, निधी जमविणे, त्यांच्या जेवणाखाणाची सोय करणे, त्यांच्या नानाविध अडचणी सोडविणे अशी कामे समोर होती पण ताईंनी अनेक वेळा पूरग्रस्तांना दिलासा, धीर दिला. सहाय्य केले. अनेकांचे संसार उभे करुन दिले. त्याअगोदर 1955 मध्ये गोमंतक विमोचन साहाय्य समितीने गोमंतकात सत्याग्रह करुन गोमंतक प्रवृत्तीचा मोठा प्रयत्न केला. ताईंचे पती विनायकराव हे समितीचे कार्यवाह होते. ताईंनी त्यांच्या बरोबरीने काम केले, पुण्यात येणाऱ्या सत्याग्रहींसाठी औषधपाणी, जेवणखाण इत्यादी कामे त्यांनी सेविकांच्या साहाय्याने पार पाडली.


खेडयांकडे चला असा गांधीचा संदेश होता. ताईंचाही पहिल्यापासून समाजसेवेकडे कल. त्यांनी पुणे जिल्हयाच्या शिवळी तालुक्यातील राऊतवाडी या छोटया उपेक्षित गावाला जणू दत्तकच घेतले. अनंत व्याप असून त्या नियमितपणे राऊतवाडीला जात असत. गावातील अनेक सामाजिक उपक्रमांना, कार्यांना त्यांनी चालना दिली. एकोपा, सेवा हे त्यांचे ध्येयच होते. बनूताई केवटे या ग्रामीण महिलेला त्यांनी इतकं मोठं केलं की झोपडीत दडलेल्या त्या महिला उत्तम वक्त्या झाल्या. उत्तम कार्यकर्त्या झाल्या. 1972 च्या दुष्काळात तर राऊतवाडीसाठी ताईंनी अपार कष्ट केले. अशा अनेक सेवाकार्यांचा उल्लेख करता येईल.


1975 मध्ये आणीबाणी आणि सहस्त्रावधी कार्यकर्त्यांची धरपकड झाली. अनेक घरे उघडी पडली. त्याही वेळी ताई नि सेविका धावून आल्या. जे जे कार्यकर्तेकारागृहात होते त्यांच्या धरी जात. त्यांचा या गृहिणींना, कुटुंबियांना मदत करण्याचा उपक्रम आणीबाणी उठेपर्यंत चालू होता.


1978 मध्ये मावशी केळकर निवर्तल्यानंतर अखिल भारतीय  कार्याचा भार ताई आपटे यांच्यावर पडला. पूर्वीची एक छोटी गृहिणी आज एका अखिल भारतीय संघटनेची प्रमुख झालेली होती आणि हे व्रत त्यांनी 1978 ते 1994 म्हणजे 16 वर्षे अखंडितपणे चालविले.


जोशी, सु. हृ

खंड विभागणी

Scroll to top