खाडिलकर नीलकंठ यशवंत


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

bhau-photo-11खाडिलकर नीलकंठ यशवंत : (६एप्रिल १९३४)- मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक चमत्कार मानले गेले. दंतकथाच झाले. अग्रलेखांचे बादशहा आणि खास मॅरेथॉन मुलाखतींचे सम्राट म्हणून ओळखले जातात.


भारत सरकारने त्यांना १९९२ साली पद्मश्री पदवी तर महाराष्ट्र सरकारने विलासराव देशमुखांच्या हस्ते लोकमान्य टिळक पहिला जीवनगौरव पुरस्कार दिला. त्याचप्रमाणे ना. शरद पवार व ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘सुधारक’ कार गोपाळ गणेश आगरकर सुवर्णपदक पत्रकारिता पुरस्कार मिळाला. वृत्तपत्रविक्रेता संघातर्फे जीवनगौरव. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जाहीर भाषणात म्हणाले की, आजोबांचा नातू शोभतो. (नाट्याचार्य, क्रांतिकारक व पत्रकार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा नातू.) स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या भेटीस गेले असता त्यांनी पुष्पहार गळ्यात घातला.तेव्हा बाळाराव सावरकर व जाहिरात प्रतिनिधी नगरकर होते.


त्यांनी घेतलेली रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्री. मा. सा. गोळवलकरगुरूजी यांची मुलाखत प्रचंड गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. नीलकंठ खाडीलकर यांच्या ‘टॉवर्स’ या पुस्तकात ही मुलाखत आहे. त्याचप्रमाणे श्रीसत्यसाईबाबा यांची मुलाखतही अशीच गाजत राहिली. त्यांनी मागोमाग श्री दत्ता बाळ, परमपूज्य गगनगडकरमहाराज, स्वामी चिन्मयानंद आदि संतांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत ‘नवाकाळ’ मध्ये लागोपाठ सहा दिवस छापली. (२१ ते २६ जानेवारी १९९५) पत्रकार नरूभाऊ लिमये यांनी या मुलाखतीची आर्ट पेपरवर पन्नास हजार पत्रिका छापली व सर्वत्र पाठविली. स्मरणशक्तीबद्दल प्रसिद्ध. माजी केंद्रीय मंत्री आणि ‘यंग टर्क’ मोहन धारिया यांनी लिहिले- ‘आपल्या स्मरणशक्तीला नेहमीच प्रणाम करावेसे वाटतात.’ कॉ. श्रीपाद डांगे यांच्यातर्फे सुवर्णपदक.


शालेय शिक्षण चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले. आंतरशालेय वक्तृत्त्व स्पर्धेत पहिले पारितोषिक.विल्सन कॉलेजातून ‘संपूर्ण अर्थशास्त्र’ हा विषय घेऊन पदवीधर. मुंबई विद्यापीठाचे बुद्धिबळ चॅम्पियन झाले. विल्सन कॉलेजात ‘बेस्ट स्टुडंट ॲवॉर्ड’ मिळाले. अर्थशास्त्र शिकविणारे फेलो म्हणून नेमणूक झाली.


 

ते १९५५ साली पदवीधर झाले. त्यावेळी दैनिक ‘नवाकाळ’ ची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली होती. ‘नवाकाळ’ दोनचार महिन्यांत बंद पडणार असे पत्रकार म्हणत होते. अशावेळी नीलकंठ खाडिलकर विल्सन कॉलेजातील फेलोशिप सोडून ‘नवाकाळ’ ऑफिसात आले. लोकप्रियतेचा असा चमत्कार केला की, ‘नवाकाळ’ हे महाराष्ट्रातील कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा अधिक खपाचे दैनिक आहे असे भारतीय प्रेस रजिस्ट्रारच्या अहवालात जाहीर करण्यात आले. एबीसी या वृत्तपत्रांचे खप निश्चित करणाऱ्या संस्थेच्या प्रमाणपत्रांनी तेच दाखविले. ए ॲण्ड एम (ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड मार्केटींग या प्रतिष्ठेच्या मासिकाने लिहिले की, ‘नवाकाळ’ची खपातील वाढ अद्वितीय व अनुपम आहे.

‘नवाकाळ’च्या खपवाढीचा जगन्नाथाचा रथ थांबविताच येत नाही. ‘नवाकाळ’ची प्रगती ‘फ्रॉम फ्लॉप टू टॉप’ म्हणजे संपूर्ण अपयशातून शिखरापर्यंत झाली. एक हजार खपापासून साडेतीन लाखांवर खप झाला. एबीसी  प्रमाणपत्रांनी हा चमत्कार सिद्ध केला. ‘नवाकाळ’चा एक दिवसाचा सात लाख खप हा विक्रम कुणी मोडला नाही. दैनिक ‘नवाकाळ’चे संपादक होते. या काळात त्यांचे नव्या शैलीतील मॅरेथॉन वृतांत व मुलाखती आणि विविध विषयांवरील अग्रलेख यांनी सर्वानी विस्मयचकित केले.


त्यांनी सोविएत रशियाचा १९८३ साली एक पंधरवडा दौरा केला. परत आल्यावर त्यांनी लिहिले की,‘मार्क्सने समाजवाद्यांचे कल्पनारम्य स्वप्न (युटोपिया) फेटाळले आणि स्वत:चे ‘प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे मिळेल’ हे मार्क्सवादी स्वप्न (युटोपिया) पाहिले. पण माणूस गणितात बसत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षङ्‌विकार माणसात अंगभूत आहेत. यामुळे मार्क्सचे अंतिम उद्दिष्ट हे स्वप्नच राहिल. यावेळी त्यांनी  ‘प्रॅक्टिकल सोशॅलिझम’ ही स्वत:ची विचारसरणी सादर केली. त्याबद्दल पाच मॅरेथॉन (प्रदीर्घ) अग्रलेख लिहिले. विख्यात पत्रपंडित पां. वा. गाडगीळ यांनी लिहिले की, मार्क्सवादावरची ही पहिली ओरिजिनल टीका आहे. मला मान्य आहे. मी स्वत: प्रचार करीत फिरेन.


शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना ही विचारसरणी  अत्यंत आवडली. त्यांनी जाहीर केले की, ‘‘यापुढे प्रॅक्टिकल सोशॅलिझम ही शिवसेनेची विचारसरणी असेल. शिवसेनेच्या शिवाजीपार्कवरील प्रचंड दसरा मेळाव्यात प्रॅक्टिकल सोशॅलिझमचे अग्रलेख छापलेले पन्नास हजार अंक देण्यात आले.


यानंतर प्रॅक्टिकल सोशॅलिझम फ्रण्टतर्फे उद्ध्वस्त गिरणीकामगारांचे प्रचंड आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री ना. शंकरराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळे आणि आंदोलनामुळे गिरणीकामगारांना नऊ कोटी रुपये मिळवून देण्यात आले. खाडिलकरांनी ‘अहिंसक अचानक आंदोलन’ हा आंदोलनाचा नवा प्रकार आणला. या मार्गाने नाभिक, चर्मकार व धोबी यांचेही आंदोलन चालवून त्यांचे प्रश्न सोडविले.

त्यांनी श्री. दि. वि. ऊर्फ बंडोपंत गोखले यांच्यासह शर्थ केली. अभिरूप विधानसभा/लोकसभा यांचे कार्यक्रम करून उत्पन्न मिळवित बंद पडलेल्या मुबंई मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन केले. बंद पडलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे मुबंईत ना. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन भरविले. ते मुबंई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि विश्वस्त झाले. मराठी भाषेसाठी झटले. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परिक्षेत प्रथम भाषा मराठीत सर्वात जास्त गुण मिळविणारा विद्यार्थी /विद्यार्थीनी याच्यासाठी १० हजार रुपयांचे बक्षिस ठेवले. कोणत्याही एका विषयासाठी एवढे पारितोषिक नाही. यामुळे लाखो विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्यात मराठी भाषेचा मान वाढला. मराठी भाषा द्वितीय विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आणखी १० हजाराची तीन बक्षिसे (५+३+२) ठेवली.  

बुद्धिबळ या खेळाच्या क्षेत्रात त्यांनी फार मोठी कामगिरी केली. त्यांनी देशात महिलांचे बुद्धिबळ सुरू केले. त्यांच्या तीन कन्या वासंती, जयश्री व रोहिणी यांना बुद्धिबळ शिकविले. त्या तिघीही त्यांच्या वयाच्या १३व्या वर्षी राष्ट्रीय महिला चॅम्पियन झाल्या. सतत सात वर्षे राष्ट्रीय चॅम्पियन राहिल्या. तिघा बहिणींनी चार बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा जागतिक विक्रम आहे. महिला बुद्धिबळात भारताचे नाव जागतिक पातळीवर नेले.

त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांची आठवण व्हावी असे कार्य केले. रोहिणीने अनेक पुरुष खेळाडूंचा पराभव केला. यामुळे सनसनाटी माजली आणि राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत स्त्रियांना मज्जाव करण्याचा ठराव अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने केला. लगेच खाडिलकरांनी न्यायालयात व जागतिक बुद्धिबळ संघटनेकडे दाद मागितली. जागतिक बुद्धिबळ फेडरेशनने निर्णय दिला की, स्त्रियांना राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांत पुरषांबरोबर खेळण्याचा हक्क आहे आणि जर नाकारला तर भारतीय बुद्धिबळ संघटनेची संलग्नता रद्द होईल. न्यायालयानेही तसाच निर्णय दिला.

भारतात महिलांचे बुद्धिबळ सुरू केले आणि महिलांना पुरुषांसमवेत स्पर्धेत भाग घेण्याचा हक्क मिळवून दिला. यामुळे अनेक मुली व स्त्रिया विविध स्पर्धांत पुरुषांबरोबर भाग घेत आहेत. किंबहुना भारतीय महिला जागतिक महिला बुद्धिबळ अजिंक्यवीर होण्याचा दिवस जवळ आला आहे. बुद्धिबळाच्या प्रचारासाठी गिरगाव चेस सर्कल चालविले. 

एकापेक्षा एक गाजलेली ३६ पुस्तके लिहिली. तरुणांना स्फूर्ती व हिंमत मिळावी या हेतूने आदर्श उभे केले. राजे शिवाजी हे पुस्तक तीन लाख संपले. न संपणारी विक्री सुरूच आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी, श्रीराम, श्रीकृष्ण आदि सर्वच पुस्तके पन्नास हजारहून अधिक विकली गेली. लेखननामा, अग्रलेखांचे बादशहा, बादशाही अग्रलेख, शूरा मी वंदिले, माझा मऱ्हाठाचि बोलु कौतुके असे अग्रलेखांचे पाच संग्रह आहेत. ‘प्रतापराव’ हे नाटक प्रसिद्ध झाले. मुख्य म्हणजे ‘नियती’ या मराठी-इंग्रजी-हिंदी- गुजराती अशा चार भाषांतील पुस्तकात स्वतःचे ‘नीलकंठी तत्त्वज्ञान’ मांडले. बाबामहाराज सातारकर यांनी अभिप्राय दिला की, लेखक नीलकंठ खाडीलकर ‘नियती’मुळे दर्शनकार झाले आहेत. ‘भेळ’या पुस्तकात तीन उत्तम कविताही आहेत. कल्पकता म्हणजे  ‘खिशात मावणारे व खिशाला परवडणारे’ अशी जाहिरात करून खास पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे   ‘अग्रलेखांच्या बादशहाचे अग्रलेख’ या विषयावर प्रबंध लिहून औरंगाबादचे प्रभु गोरे यांनी डॉक्टरेट मिळविली.

पत्रकाराला माहितीचा उगम न सांगण्याचा हक्क आहे असे म्हणत सेशन्स न्यायालयात न्यायमूर्ती कुटिन्हो यांच्यासमोर संघर्ष केला. 

 

नीलकंठ खाडिलकरांची भाषा साधी, सोपी आणि प्रवाही आहे. डौलदार व नाट्यपूर्ण आहे. हास्यरसाचाही शिडकाव असतो. विख्यात लेखिका सौ. विजया वाड एकदा कौतुकाने म्हणाल्या, ज्ञानोबा, विनोबा आणि निळोबा यांनी मराठी भाषेचे अमृत केले. अर्थात आचार्य अत्रे यांना कधीच विसरता येणार नाही.

ना. सुशीलकुमार शिंदे यांनी सारांशरूप गौरव केला की, अजोड अग्रलेख लिहिलेच. पण स्वत:ची प्रॅक्टिकल सोशॅलिझम ही राजकीय विचारसरणी आणि स्वतःचे नीलकंठी तत्त्वज्ञान मांडणारे स्वातंत्र्यानंतरचे एकमेव पत्रकार आहेत.


-वाबळे नरेंद्र विश्वनाथ  

खंड विभागणी

Scroll to top