देशमुख, विलासराव दगडोजीराव


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

देशमुख, विलासराव दगडोजीराव : (२६ मे १९४५-१४ ऑगस्ट २०१२). महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कुशल संघटक व काँग्रेसमधील समन्वयशील राजकारणी. त्यांचा जन्म दगडोजीराव व सुशिलादेवी या दांपत्यापोटी बाभळगाव (जि. लातूर) येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी बी. ए. एल्. बी. या पदव्या पुणे विद्यापीठातून घेतल्या.


त्यांची दुष्काळ निवारण समितीच्या चिटणीसपदी नियुक्ती झाली (१९७१) आणि सामाजिक कार्याकडे ते आकृष्ट झाले. सुरुवातीला त्यांनी बाभळगाव ही कर्मभूमी ठरविली. बाभळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली व सरपंचपद भूषविले (१९७४-७६). याच काळात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक होते. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी पदे मिळविली. दरम्यान त्यांची युवक काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष आणि लातूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून निवड झाली. पुढे ते विधानसभेचे सदस्य होते (१९८०-१९९५ आणि १९९९-२००९). मात्र १९९५ मधील विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. यावेळी नैराश्यातून ते काँग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र उमेदवार म्हणून विधानपरिषदेची निवडणूक लढविली, पण येथेही त्यांचा पराभव झाला. ते स्वगृही काँग्रेसमध्ये परत आले. 

काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रथम राज्यमंत्री म्हणून ग्रामविकास, तंत्रशिक्षण, सार्वजनिक बांधकाम, सहकार, क्रीडा व युवक कल्याण आणि गृह इ. खात्यांचा कार्यभार सांभाळला (जानेवारी १९८२-जून १९८५). पुढे कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, सांस्कृतिक कार्य आदी खात्यांचे ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर निवड झाली (१८ ऑक्टोबर, १९९९). यावेळी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे संयुक्त सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाला रोखण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत (१९९९-२००३) केला; तथापि त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले (१८ जानेवारी २००३) आणि सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. राजकीय अनुभव आणि विकासात्मक दृष्टी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यात आले (नोव्हेंबर २००४). मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर (२००८) त्यांना राजीनामा द्यावा लागला. तरीही त्यानंतरच्या वर्षी झालेली राज्यसभा निवडणूक जिंकून ते केंद्रात अवजड उद्योगमंत्री झाले (२००९-२०११). पुढे त्यांच्याकडे प्रथम ग्रामविकास व पंचायत राज्य व नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ख्याती सुपूर्त करण्यात आली (१२ जुलै २०११). आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१५ जुलै २०११).


हाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम समृद्धी अभियान, गुटखा विक्रीवर बंदी, मराठी शाळांत पहिलीपासून इंग्रजी शिक्षण, ग्रामसभांचे सक्षमीकरण, माहितीचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी, डान्सबार बंदी, १९ हजार शिक्षकांच्या शिक्षणसेवक म्हणून ठोक मानधनावर नेमणूका, नवीन गृहनिर्माण धोरण, सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, शासकीय सेवेत खेळाडूंना पाच टक्के आरक्षण, अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद, प्लॅस्टीक बंदी, अंध-अपंगाना एस्टीच्या निम-आराम बस भाड्यात ७५ टक्के सवलत, आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज आदि धोरणात्मक निर्णय कार्यवाहित आणले, तसेच लातूर जिल्ह्याच्याही विकासास योगदान दिले. या काळात मुंबईतील महापूर, लोकलमधील बॉम्बस्फोट (२००६), विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईवरील दहशतवाद्यांचा हल्ला (२००८), या समस्यांबरोबर सानंदा प्रकरण, आदर्श वास्तू घोटाळा अशा वादग्रस्त प्रकरणांनाही त्यांना सामोरे जावे लागले. नर्मविनोदी वक्तृत्वशैली आणि सर्वांशी (अगदी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी) असलेले सौहार्दपूर्ण संबंधांमुळे एक लोकप्रिय, संयमी व तडफदार मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांना संगीत, चित्रपट, कला-क्रिडा यांचा शौक होता. वाचन, शास्त्रीय संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.


रपंच ते मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आदी पदे भूषविणारे विलासराव यांचे यकृताच्या आजाराने चेन्नई येथे निधन झाले.


त्यांच्या पत्नीचे नाव वैशाली असून लहान बंधू दिलीपराव हे माजी मंत्री व विद्यमान आमदार आहेत. विलासरावांचे अमित, रितेश, धीरज हे तीन सुविद्य मुलगे अनुक्रमे राजकारण, अभिनय व उद्योग अशा विभिन्न क्षेत्रांत कार्यरत आहेत.


मिठारी, सरोजकुमार

खंड विभागणी

Scroll to top