जाधव, रावसाहेब गणपतराव


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

जाधव, रावसाहेब गणपतराव : (२४ ऑगस्ट १९३२).

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष व मराठी विश्वकोशाचे माजी प्रमुख संपादक. त्यांचे मूळ गाव सातारा. त्यांचा जन्म बडोदे (गुजरात) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुरुवातीचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण सातार्‍यात घेऊन मॅट्रिकनंतर (१९४९) किरकोळ नोकऱ्या करीत ते पुणे विद्यापीठातून एम्. ए. (१९५८) परीक्षेत पहिले आले; परंतु बहिःस्थ विद्यार्थी म्हणून त्यांना सुवर्णपदक लाभले नाही. त्यांची अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात अधिव्याख्याते म्हणून नियुक्ती झाली. पुढे एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथे त्यांची बदली झाली. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे अध्यापन केले. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांना वाई येथील मराठी विश्वकोशाच्या कार्यालयात विभाग संपादक पदावर नेमले (१९७०). या सेवेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली (१९८९) आणि उर्वरित जीवन लेखन-वाचन यांत व्यतीत करण्याचे ठरविले आणि विपुल स्फुटलेखन व ग्रंथलेखन केले.


विश्वकोश कार्यालयातील सेवाकाळात त्यांनी मराठी विश्वकोशाच्या खंडांचे पद्धतशीर आयोजन केले आणि वर्णक्रमाने एक एक खंड पूर्ण करण्याचा आत्मविश्वास प्रमुख संपादकांकडे व्यक्त केला. प्रत्येक खंडातील मानव्यविद्या कक्षेतील प्रत्येक नोंद त्यांनी डोळ्याखालून घातली; इतकेच नव्हे तर चिकित्सक दृष्टिकोनातून तपासली आणि ज्या काही नोंदी (लेख) सिद्धहस्त लेखकांकडून वेळेवर लिहून आल्या नव्हत्या, त्या लिहून घेण्याची व्यवस्था केली. प्रंसगोपात स्वतः काही नोंदी लिहिल्या. तसेच विश्वकोशाच्या खंडासोबत द्यावयाची रंगीत व एकरंगी विपुल चित्रे व चित्रपत्रे निवडून त्यांच्या मुद्रणाचे व्यवस्थित नियोजन केले आणि लेखन, समीक्षण, संपादन, छपाई, मुद्रितशोधन इ. प्रक्रियांचे काटेकोर कवेळापत्रक राबवून त्यांनी स्वतःच्या निवृत्तीपूर्वी सतरा वर्षात परिभाषाखंडासह बारा खंड अथक परिश्रमांनी प्रकाशित केले. अर्थात तत्कालीन संपादकवर्गानेही त्यांना सक्रिय सहकार्य दिले. मराठी विश्वकोशाचे त्यानंतर रेंगाळलेले खंड पाहता, जाधवांचे हे योगदान निश्चित उल्लेखनीय म्हणावे लागेल.


रा. गं. ची मुख्य ख्याती समीक्षक म्हणून आहे. वियोगब्रह्म (१९९५) व मावळतीच्या कविता (१९९७) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. यांखेरीज त्यांनी फारसे सर्जनशील लेखन केले नाही. त्यांनी मुख्यत्वे काव्यसमीक्षा केली असून त्या दृष्टीने कविता आणि रसिकता (१९९५), आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९९६), साठोत्तरी मराठी कविता व कवी (१९९७) या ग्रंथांचा निर्देश करता येईल. यांशिवाय त्यांनी साहित्यिक दृष्टिकोनातून मराठी संतकवींचा, तसेच वि. स. खांडेकर, पु. ना. भावे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे आदी श्रेष्ठ साहित्यिकांचा आस्वादक व चिकित्सक मागोवा प्रतिमा (१९८२), डोहकाळिम्यात डोकावताना (जी. ए. कुलकर्णी, १९८८), आनंदाचा डोह (तुकाराम, १९७६), प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार (१९९७) इ. ग्रंथांतून घेतला आहे. साहित्य व सामाजिक संदर्भ (१९७५), कला, साहित्य व संस्कृती (१९८६), सांस्कृतिक मूल्यवेध (१९९२), पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य (१९९६), मराठी वाड्.मय : स्वातंत्र्योत्तर संदर्भ (१९९८), वागर्थ (२०००) या ग्रंथांतून त्यांनी मराठी साहित्याची तात्त्विक व उपयोजित समीक्षा केली आहे. निळे पाणी (१९८२),  पंचवटी (कथा, नाटक कविता या वाङ्मयप्रकारांची चिकित्सा, १९८५), अश्वत्थाची सळसळ (वाङ्मयीन संस्कृती व सामाजिकता, १९८५), वाङ्मयीन आकलन (१९७७), मराठीतील कथारूपे (१९९९), इ. पुस्तकांतून त्यांनी मुख्यत्वे मराठी कथनात्मक व नाट्यवाङ्मयाची समीक्षा केली आहे. तर निळी पहाट (१९७८), निळी क्षितिजे (१९८२) व तृतीया (१९९३) यांतून दलित वाङ्मयाची आस्वादक व चिकित्सक समीक्षा केली आहे. तद्वतच नववाङ्मयीन प्रवृत्ती व प्रमेये (१९७२), साठोत्तरी मराठी कविता व कवी (दिलीप चित्रे व अरुण कोलटक या कवींच्या काव्याची समीक्षा), आगळीवेगळी नाट्यरूपे (१९९८) इ. समीक्षाग्रंथांतून त्यांनी आधुनिक साहित्यातील वेगवेगळ्या प्रवृत्ति-प्रवाहांची चर्चा-चिकित्सा केली आहे. याशिवाय रा. गं. नी काही वैचारिक लेखांचे संपादन केले असून त्यांपैकी विचारशिल्प (१९७५) हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या काही निवडक लेखांचे संपादित पुस्तक विशेष गाजले. गांधीयुगातील एक नमुनेदार कर्मयोगी विचारवंत या नात्याने त्यांच्या विचारकार्याची मीमांसा जाधवांनी या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेत केली आहे. त्यांच्या अन्य महत्त्वपूर्ण संपादित ग्रंथांत निवडक साने गुरुजी (१९९९), मराठी वाङ्मयाचा इतिहास (खंड ७ वा, ३ भाग) तसेच सा. साधनातील निवडक लेखांचे संकलन-निवडक साधना (-खंड-) यांचा समावेश होतो. शास्त्रीजी (१९९४) हे त्यांचे तर्कतीर्थ जोशींविषयीचे पुस्तकही या संदर्भात महत्त्वाचे आहे. मराठी भाषेच्या अभ्यासकांना खास उपयुक्त ठरतील अशी वाङ्मयीन निबंध लेखन (१९६८), वाङ्मयीन आकलन, साहित्यसंचित (१९९१) इ. काही संकीर्ण समीक्षात्मक पुस्तके त्यांनी सिद्ध केली. रा. गं. ची समीक्षा पूर्वग्रहविरहित निःपक्षपातीपणे साहित्यिक गुणांचे मूल्यमापन करणारी असते. ते दोषांवर अचूक बोट ठेवतात, पण त्याच वेळी गुणांचे प्रांजळपणे कौतुक करतात. त्यांच्या समीक्षात्मकक लेखनात कुठेही कटुतेचा लवलेश नसतो. त्यांनी साहित्याचे परिस्थितिविज्ञान (इकॉलॉजी ऑफ लिटरेचर) ही नवी वाङ्मयीन संज्ञा मराठी समीक्षा क्षेत्रात रूढ केली. साहित्यकृतीचे सजीवत्व सांस्कृतिक पर्यावरणाशी असलेले साहित्याचे नाते यांचा तात्त्विक ऊहापोह त्यांनी केला आहे. पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य (१९९६) या त्यांच्या पुस्तकात या संज्ञेचे स्पष्टीकरणात्मक विवरण आढळते. निवडक समीक्षा: प्रा. रा. ग. जाधव (२००६) या लेखासंग्रहात त्यांच्या तात्त्विक व उपयोजित समीक्षेचे वेधक दर्शन घडते.


रा. ग. जाधवांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांच्या साहित्य व सामाजिक संदर्भ (१९७५), आनंदाचा डोह (१९७६) निळी पहाट (१९७८) व प्रतिमा (१९८२) या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार लाभले. याशिवाय त्यांच्या काही पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेची पारितोषिके तसेच रा. श्री. जोग व जी. ए. कुलकर्णी पारितोषिके मिळाली. शिवाय ग्रंथोत्तेजक पुरस्कार (इचलकरंजी), ढवळे मुद्रण पुरस्कार, श्री. ना. बनट्टी पुरस्कार, छंद पारितोषिक, म. फुले-आंबेडकर साहित्य सभा पुरस्कार, यशवंतराव चव्हाण, अस्मितादर्श मदने पुरस्कार प्रियदर्शनी पुरस्कार (मुंबई) इत्यादी लाभले. नाशिकचा अत्यंत प्रतिष्ठित असा युगांतर प्रतिष्ठान पुरस्कार लाभला (१९९८). अस्मितादर्श सम्मेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले (१९९६). महाराष्ट्र शासनाने त्यांच्या लेखनकार्याचा, विशेषतः ज्ञानकोशीय प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादकपदही त्यांच्याकडे सूपूर्द केले (कार्यकाल १६ जानेवारी २००१ ते १० फेब्रुवारी २००३). औरंगाबाद येथे भरलेल्या ७७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (२००४).


संदर्भ: पारगावकर, अरुण, संपा. संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव, पुणे, २००४.


देशपांडे, सु. र.

खंड विभागणी

Scroll to top