ॲक्झेल, रिचर्ड


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

ॲक्झेल, रिचर्ड ( जुलै १९४६) : अमेरिकन शास्त्रज्ञ. गंध तंत्रिका तंत्रासंबंधी विशेष संशोधन कार्य केल्याबद्दल त्यांना लिंडा बी. बक यांच्या समवेत २००४ सालचे मानवी वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.


ॲक्झेल यांचा जन्म न्यूयॉकर् (अ. सं. सं.) येथे झाला. त्यांना कोलंबिया विद्यापीठाची ए. बी. (१९६७) आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन याची एम्. डी. (१९७०) या पदव्या मिळाल्या. १९७८ मध्ये ते कोलंबिया विद्यापीठात विकृतिविज्ञान आणि जीवरसायनशास्त्र या विद्याशाखेचे सदस्य झाले. १९८४ मध्ये ते हाउअर्ड ह्यूझ मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून रूजू झाले.


ॲक्झेल आणि बक यांनी एकत्रितपणे १९९१ मध्ये मूलभूत असा संशोधनपर लेख प्रसिध्द केला. या लेखामध्ये त्यांनी प्रयोगशाळेतील उंदरांवर प्रयोग करून गंध-ग्राहक निर्माण करणाऱ्या सु. १,००० जनुकांच्या (जीनांच्या) समुहाचे स्पष्टीकरण दिले. गंध रेणू ओळखण्यास कारणीभूत ठरणारे हे गंध-ग्राहक नासागुहिकेच्या मागील बाजूस अतिशय लहान जागेत एकवटलेले असतात. ॲक्झेल आणि बक या दोघा शास्त्रज्ञांनी गंध तंत्रिका तंत्र कसे कार्यान्वित होते ते स्पष्ट केले. प्रत्येक ग्राहक कोशिकेमध्ये ठराविकच गंध ओळखणारे गंध-ग्राहक असतात. गंध रेणू गंध-ग्राहकाला जोडले गेल्यानंतर ग्राहक कोशिका विद्युत् संकेत मेंदूतील गंधकंदापर्यंत पोहोचवितात. मेंदूमध्ये विविध प्रकारच्या ग्राहकांकडून आलेली माहिती ठराविक पध्दतीने जुळवून घेतली गेल्यानंतर वेगवेगळे गंध ओळखले जातात. ॲक्झेल आणि बक यांची अनेक निष्कर्षावरून खात्री झाली की, उंदीर, मानव आणि इतर प्राणी यांच्या गंधज्ञानात बरेच साम्य आहे.


ॲक्झेल यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : जीवरसायनशास्त्रातील इली लिली पुरस्कार (१९८३), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचा रिचर्ड लाउन्सबेरी पुरस्कार (१९८९), तंत्रिका तंत्र विषयातील संशोधनाबद्दल ब्रिस्टोल-मेयर्स स्क्विब पुरस्कार (१९९८), मज्जाविकृती संशोधनाबद्दल गॅर्डनर फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार इत्यादी. ते नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (१९८३), अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९८३), अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी (२००३) इ. संस्थांचे सदस्य होते.


साळुंके, प्रिती म. 

खंड विभागणी

Scroll to top