मुखर्जी, प्रणव कामदाकिंकर :


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

मुखर्जी, प्रणव कामदाकिंकर : (११ डिसेंबर १९३५): भारताचे तेरावे राष्ट्रपती, विख्यात अर्थतज्ज्ञ आणि राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील मिराती (जि. बीरभूम) येथे कामदाकिंकर राजलक्ष्मी या दांपत्यापोटी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई-वडिलांनी स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल तुरुंगवास भोगला होता. त्यामुहे घरातूनच त्यांना राजकीय वारसा लाभला होता. त्यांनी एम्.ए. (इतिहास-राज्यशास्त्र) आणि एल्‌एल्.बी. या कलकत्ता विद्यापीठाच्या पदव्या संपादन केल्या.


प्रारंभी लिपीक, प्राध्यापक अशा नोकऱ्या केल्यावर ते पत्रकारितेकडे आकृष्ट झाले. तसेच काही काळ वकिलीचाही व्यवसाय केला. पल्ली-ओ-पंचायत संबद या बंगाली मासिकाचे त्यांनी संपादन केले. पुढे देशेर दाक हे बंगाली साप्ताहिक काढले संपादक झाले (१९६७-७१). राष्ट्रीय चळवळीतील आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेऊन ते राजकारणात पडले. त्यांची राज्यसभेवर निवड झाली (१९६९). तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. ते सलग पाच वेळा राज्यसभेवर (१९६९, १९७५, १९८१, १९९३, १९९९) आणि दोन वेळा लोकसभेवर (२००४ २००९) निवडून आले. या काळात त्यांनी औद्योगिक विकास (१९७३-७४), वाणिज्य (१९८०-८२), अर्थ (१९८२-८४), परराष्ट्र (१९९५-९६) अशी मंत्रीपदे भूषविली. तसेच राज्यसभेत ते काँग्रेस पक्षाचे नेते होते. काँग्रेस कार्यकारिणीवर ते २३ वर्षे सदस्य होते. तथापि मध्यंतरी पक्षातील मतभेदातून त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली (१९८५). तेव्हा त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला (१९८६); पण पंतप्रधान राजीव गांधींच्या मध्यस्थीने पुढे तो काँग्रेसमध्ये विलीन केला (१९८९). पुढे त्यांची नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली (१९९१-१९९६). याच काळात सार्क परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९९५). पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण (२००४-०६), परराष्ट्र अर्थ (२००६-२००९ आणि २००९-२६ जून २०१२) अशा विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. याशिवाय लोकसभेत ते काँग्रेस पक्षाचे नेते होते (२००४-२०१२). बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. मंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक वैकासिक योजनांबरोबरच काही प्रशासकीय सुधारणा केल्या. तसेच माहितीचा अधिकार, रोजगार अधिकार, माहिती तंत्रज्ञान दूरसंचारण, मेट्रो रेल्वे, प्रादेशिक ग्रामीण बँका अशा विविध क्षेत्रांतील विधायक सुधारणांना चालना दिली त्यांपैकी काही कृतीत आणल्या. भारत-अमेरिका अणुकरारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


त्यांनी राज्यपाल मंडळ, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, आफ्रिकन विकास बँक यांवर काम केले. तसेच राष्ट्रकूल अर्थमंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले (१९८२, १९८३ १९८४). संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले (१९९४, १९९५, २००५ २००६). बांडुंग येथील चाळीसाव्या आफ्रो-आशियाई परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले (१९९५). फुरसतीच्या वेळात त्यांनी बियाँड सर्व्हाइव्हल (१९८४), ऑफ ट्रॅक (१९८७), सागा ऑफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाइस (१९९२), चॅलिंजीस बिफोर नेशन (१९९२) इत्यादी पुस्तके लिहिली आहेत.


ते एक अभ्यासू, कार्यक्षम आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता आहेत. याचा विचार करून संयुक्त पुरोगामी आघाडीने त्यांची राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी घोषित केली आणि ते निवडून आले (२५ जुलै २०१२). आपल्या भाषणात त्यांनी गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यांच्या निर्मूलनाबरोबरच शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार युवकांना अधिक संधी यांवर भर दिला.


यूरो मनी नियतकालिकाचा (न्यूयॉर्क) सर्वोत्तम अर्थमंत्री (१९८४), सर्वोत्कृष्ट संसदपटू (१९९७), पद्मविभूषण (२००८), फायनान्स मिनिस्टर ऑफ यीअर फॉर एशिया (२०१०), बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ इंडिया अवॉर्ड (२०११) अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव शुब्रा असून त्यांना एक मुलगी (शर्मिष्ठा) दोन मुलगे (अभिजीत आणि इंद्रजीत) आहेत.


 

मिठारी, सरोजकुमार 

खंड विभागणी

Scroll to top