जी-आठ


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

जी-आठ : वैश्विक आव्हानांना चर्चा कृती यांद्वारे सामोरे जाण्यासाठी स्थापन झालेला अनौपचारिक पण सशक्त असा आठ राष्ट्रांचा दबाव गट. या गटाला स्थायी कार्यालय नाही, तसेच स्थायी कर्मचारी वर्ग नाही किंवा अंदाजपत्रक नाही. सुरुवातीला १९७५ मध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ग्रेट ब्रिटन अमेरिकेची संयुक्ते संस्थाने या सहा औद्योगिक देशांनी त्याची स्थापना राँब्यूए (फ्रान्स) या गावी केली. पुढे कॅनडा हा देश सॅन वॉन (प्वेर्त रीको) येथील १९७६ च्या परिषदेत या गटात सामील झाला आणि बर्मिंगहॅम (ग्रेट ब्रिटन) येथील 1998 च्या परिषदेत रशिया या गटात आला. रशियाच्या समावेशानंतर या संघटनेची जी-आठदेश अशी ओळख तयार झाली.


हा अतिशय प्रभावशाली असा गट आहे. सन २००५ मध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सच्या पुढाकाराने या गटाचा आणखी विस्तार करण्यात आला. भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको ब्राझील या पाच विकसनशील देशांनाही या अनौपचारिक गटात सहभागी करून घेण्यात आले. या देशांच्या समावेशानंतर जी-आठ + पाच’ असे या संघटनेला ओळखण्यात येऊ लागले. या संघटनेचे अध्यक्षपद दरवर्षी एका सदस्य देशाकडे असते. वर्षारंभी अध्यक्ष निवडलेले सदस्य राष्ट्र त्या त्या वर्षांतील उपक्रमांचे संयोजन शिखर परिषदेचे आयोजन करते.


गेल्या काही वर्षांत जी-आठ परिषदांमधून पर्यावरणावर प्रामुख्याने विचारविनिमय झाला. या गटातील प्रबळ औद्योगिक देशांमधील लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या फक्त १४ टक्के आहे. मात्र एकूण जागतिक उत्पन्नाच्या ६५ टक्के उत्पन्न या देशांमधून निर्माण होते. जगाच्या एकूण ऊर्जेपैकी अर्ध्या ऊर्जेचा वापर हेच देश करतात. सर्वांत जास्त खनिजतेल हेच औद्योगिक देश वापरतात. या आठ देशांचा एकूण लष्करी खर्च जगातील एकूण लष्करी खर्चाच्या ७२ टक्के इतका आहे. या आठपैकी चार देशांकडे ९५ टक्के अण्वस्त्रसाठा आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन याच देशांकडून मोठ्या प्रमाणात होते. तथापि विकसित देशांनी २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनात ८० टक्के कपात करावी आणि उर्वरित जगाने या कालावधीत कार्बनचे उत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी करावे, असे जी-आठ देशांनी सुचविले आहे. भारत चीन या देशांत झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे जागतिक प्रदूषणात भर पडत असल्याचे निर्देश या विकसित राष्ट्रांनी दिले आहेत.


जी-आठबरोबर राहिल्याने भारताला दहशतवादाविषयी वाटत असलेली चिंता या व्यासपीठावरून मांडता आली त्याचे गांभीर्यही पटवून देता आले, हे या दबाव गटाचे वैशिष्ट्य होय.


मिठारी, सरोजकुमार

खंड विभागणी

Scroll to top