चावला, कल्पना


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

चावला,कल्पना: (‍‍‌१ जुलै १९६१- १ फेब्रुवारी २००३). अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर. त्यांनी अंतराळात दोन मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमांत त्या ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात राहिल्या होत्या. कल्पना चावला यांचा जन्म हरयाणा राज्यातील कर्नाळ या गावी १७ मार्च १९६२ रोजी श्री. बनारसीलाल आणि संज्योती चावला या दांपत्यापोटी झाला. परंतु शालेय प्रवेशाकरिता त्यांचा जन्मदिनांक बदलविण्यात आला. त्या चार भावा बहिणीत सर्वांत लहान होत्या. कल्पना यांचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीरहॅरीसन यांच्याशी झाला होता. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.

 

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण टागोर स्कूलमध्ये झाले (१९७६). त्यांनी पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगढ येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पदवी (१९८२) आणि टेक्सस विद्यापीठातून अवकाशवैमानिकी अभियांत्रिकी (एरोस्पेस एंजिनिअरींग) या विषयात पदव्युत्तर पदवी (१९८४) प्राप्त केली. त्यांनी १९८८ मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून अवकाशवैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी नासाच्या (NASA; नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) एम्स संशोधन केंद्रात शक्ति-निर्धारित संगणकीय द्रायू गतिकी (पॉवर लिफ्टेड कॉम्प्युटेशनल फ्ल्युइड डायनॅमिक्स) या विभागात कामाला सुरुवात केली. १९९३ साली त्यांची ओव्हरसेट मेथड्स इनकॉर्पोरेशन, लॉस अल्टोस (कॅलिफोर्निया) येथे उपाध्यक्ष आणि संशोधन वैज्ञानिक म्हणून निवड झाली. चावला यांनी काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदांतील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले. डिसेंबर १९९४ मध्ये कल्पना यांची निवड नासा या अंतराळवीर म्हणून, अंतराळवीरांच्या १५ व्या गटात करण्यात आली. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस, एव्हा (EVA, एक्स्ट्रा व्हेईक्युलर ॲक्टिव्हिटी), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाल्या. त्यांच्या कामात रोबॉटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळयानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली त्यांची निवड STS-८७ अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली.

 

चावला यांनी आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते या विषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एव्हाची (अवकाशात चालण्याची) कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले.


कल्पना चावला यांचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १फेब्रुवारी २००३, या १६ दिवसांच्या कालावधीचे होते. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली. मात्र या मोहिमेचा अंत दु:खद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असतांना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होत्या.

 

कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडिगढ ओल्ड बॉइज् ॲसोसिएशनने कल्पना चावला एक्सलन्स ॲवॉर्ड देण्यास सुरुवात केली आहे.

 

सूर्यवंशी वि. ल.

खंड विभागणी

Scroll to top