ठाकरे, बाळ केशव


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

ठाकरे, बाळ केशव : (२३ जानेवारी १९२६-१७ नोव्हेंबर २०१२). ‘शिवसेनाया राजकीय पक्षाचे संस्थापक, परखड पत्रकार, सिद्धहस्त व्यंगचित्रकार फर्डे वक्ते. बाळासाहेबम्हणून परिचित. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावणारे केशवराव ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे वडील होत. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर ताशेरे ओढणारे प्रबोधनकार यांच्या विचारांचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालविला. बाळासाहेबांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. विद्यार्थिदशेतच त्यांना चित्रकलेचे धडे मिळाले आणि पुढे त्यांनी तो व्यासंग वाढविला. डेव्हिड लो आणि डॉनबेरी हे त्यांचे व्यंगचित्रकलेतले आदर्श होत. प्रबोधनकारांचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढ्याची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांच्या विचाराची दिशा स्पष्ट झाली.


मुंबईच्या फ्री प्रेस जर्नल मध्ये त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून १९५९ पर्यंत नोकरी केली. तथापि संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या व्यंगचित्रांवरून व्यवस्थापनाशी मतभेद झाल्याने ती सोडली. पुढे त्यांनी मार्मिक (१३ ऑगस्ट १९६०) हे व्यंग्यचित्रात्मक साप्ताहिक सुरू केले. त्याचे ते प्रमुख संपादक झाले. मार्मिकने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. त्यांच्या व्यंगचित्रांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळालेली असून त्यांची व्यंग्यचित्रे न्यूयॉर्क टाइम्ससारख्या विख्यात इंग्रजी दैनिकातही झळकली आहेत एवढेच नव्हे, तर त्यांच्या अनेक व्यंग्यचित्रांचे पुनर्मुद्रणही झाले आहे. सर विन्स्टन चर्चिल यांच्या वरील व्यंग्यचित्रांवर आधारित एका चरित्रग्रंथात बाळासाहेब यांची व्यंग्यचित्रे अंतर्भूत केली आहेत. त्यांच्या अनेक जुन्या-नव्या व्यंग्यचित्रांचा संग्रह फटकारे या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. अमोघ वक्तृत्वशैलीबरोबरच, मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली भेदक लेखन ही बाळासाहेबांची खासियत होती. म्हणूनच त्यांच्या लेखनाला आणि भाषणांना ठाकरी शैलीअशी अनोखी ओळख मिळाली. त्यांचे लेखन मर्यादित आहे; परंतु जे आहे ते मार्मिक आहे. त्यांत कुंचले आणि फलिते, मार्मिक चिरफाड, पंचम मुंबई (१९८७), मार्मिकमधील निवडक लेख (संपादन-संकलन योगेंद्र ठाकूर विलास मुकादम) आणि सामना दैनिकातील जहाल बोचरे अग्रलेख ह्यांचा समावेश होतो.


बाळासाहेबांचे व्यंग्यचित्रकाराहून अगदी वेगळे व्यक्तिमत्त्व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेतून त्या पक्षाच्या कार्यपद्धतीतून दिसून येते. बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेने’ ची संघटना सभासदांची अधिकृत नोंदणी करून बांधली. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा मुंबईत भरला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी हे शिवसेनेचे स्फूर्तिस्थान, म्हणून संघटनेने भगवा ध्वज स्वीकारला आणि सभांमधून तुतारीचा वापर करण्याची पद्धत सुरू केली. राजकीय दृष्टीने पाहता शिवसेनेच्या विचारांची आणि कार्याची व्याप्ती प्रादेशिक होती. मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय मराठी माणसांना मुंबईत रोजगार आणि निवास यांबाबतीत अनुभवास येणारे वैफल्य दूर करून मराठी युवकांत भूमिपुत्र म्हणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी प्रचार प्रत्यक्ष प्रयत्न केले, तसेच अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या. पुढे पक्षाची व्याप्ती वाढली. तशी शिवसेनेने प्रखर राष्ट्रवादी भूमिका अंगीकारली. ह्या भूमिकेतूनच ते कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर विरोधक झाले. पुढे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दाही प्रखरपणे मांडला त्याबद्दल त्यांना अभिमान होता. प्रथम एक सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असलेल्या शिवसेनेने पुढे राजकीय सत्ता हस्तगत करणे, हे ध्येय बाळगले. पक्षाच्या प्रचारासाठी बाळासाहेबांनी दैनिक सामना हे वृत्तपत्र काढले (१९८९). त्याचे ते प्रमुख संपादक झाले. भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून त्यांनी महाराष्ट्रात युतीची सत्ता आणली राबवली (१९९५-२०००); अर्थात त्याचा रिमोट कंट्रोलबाळासाहेबच होते. गरिबांसाठी एक रुपयात झुणकाभाकर ही योजना युतीच्या सत्तेच्या काळात सुरू झाली तसेच उड्डाण पूल, मातोश्री वृद्धाश्रम, द्रुतगती मार्ग (पुणे-मुंबई), रुग्णांच्या सेवेसाठी अनेक रुग्णवाहिका ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील युतीच्या कामगिरीची काही उदाहरणे होत. बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही; मात्र शिवसेना पक्षावर त्यांची सर्वस्वी पकड होती. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करताना बाळासाहेब अनेकदा टीकेचे आणि वादाचे लक्ष्य ठरले; त्यांना मुस्लिमविरोधक ठरवले गेले; तथापि आपण राष्ट्रवादी मुस्लिमांच्या विरोधात नसून राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आहोत, असे ते म्हणत असत. तसेच गुळमुळीत लोकशाहीपेक्षा रोखठोक ठोकशाही चांगली असेही ते म्हणत.


सिक आणि व्यापक मित्रवर्तुळात वावरणारे म्हणूनही त्यांची ख्याती होती. नाटक-चित्रपट, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांशीही त्यांचे अतूट नाते होते. त्याचप्रमाणे राजकीय जगतातील नेत्यांशीही त्यांचे मित्रत्व होते. राजकीय मतभेद ह्या मित्रत्वाच्या आड आले नाहीत.


खाजगी जीवनात बाळासाहेब कुटुंबवत्सल होते. काही वर्षांपूर्वी मीनाताई या त्यांच्या पत्नींचे निधन झाले आणि एक मुलगा अपघातात मृत्यू पावला. तसेच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुतण्या राज याने शिवसेना सोडली. या घटनांचे त्यांना अतीव दु:ख झाले. जयदीप आणि उद्धव ह्या त्यांच्या मुलांपैकी उद्धव शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यात आहे. त्याची त्यांनी मृत्यूपूर्वी काही वर्षे अगोदर शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली (२००५). त्यांच्या सूनबाई स्मिता या दिग्दर्शक-निर्मात्या असून इम्फाच्या अध्यक्षा आहेत.


दीर्घ आजाराने बाळासाहेबांचे मुंबईत निधन झाले आणि हिंदुहृदयसम्राट ही बिरुदावली मिळविलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावती जीवनाची अखेर झाली.  

 

देशपांडे, सु. र.

खंड विभागणी

Scroll to top