चव्हाण, पृथ्वीराज आनंदराव


Marathi Vishwakosh

टिप : विशिष्ट नोंद पहाण्यासाठी खंडनिहाय आणि विषयनिहाय या मार्गाचा वापर करता येईल. विशिष्ट नोंद किंवा कोणत्याही विषयासंदर्भात माहिती हवी असल्यास त्याचा शोध

चव्हाण, पृथ्वीराज आनंदराव : (१७ मार्च १९४६ - ). महाराष्ट्रातील उच्चविद्याविभूषित राजनीतिज्ञ आणि महाराष्ट्र राज्याचे सव्विसावे मुख्यमंत्री. त्यांचा जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे आनंदराव प्रेमला या दांपत्यापोटी सधन कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील कुंभारगाव (ता. पाटण, जि. सातारा) हे होय. वडील आनंदराव हे ११ वर्षे केंद्रिय मंत्रिमंडळात तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सहकारी होते. आई प्रेमला या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण कराड (जि. सातारा) येथे माध्यमिक शिक्षण इंदूर येथे झाले. पुढे त्यांनी पिलानी (राजस्थान) येथून बी.ई. (ऑनर्स) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली (अ.सं.सं.) येथून एम्.एस्. या पदव्या संपादन केल्या आणि स्वत:चा संगणकनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनविलेले संगणक पोस्ट संरक्षण खात्यांत वापरले जाऊ लागले. या काळात त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून अध्यापनही केले.


आईवडिलांच्या राजकीय कारकीर्दीचा वारसा त्यांना लाभला. त्यातूनच ते राष्ट्रीय काँग्रेसकडे आकृष्ट झाले (१९७३); तथापि आपला व्यवसाय सांभाळून ते पक्षकार्य करीत होते. पुढे त्यांना कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाली (१९९१) आणि ते निवडून आले. त्यानंतर ते सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून आले (१९९६ १९९८). पुढे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची निवड झाली (२००२ २००८). त्यांनी केंद्रिय मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने, वित्त आणि नियोजन, ग्रामीण नागरी विकास स्थायी समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, दुय्यम विधी विधान, व्यवसाय सल्लागार समिती, लोकलेखा समिती अशा विविध समित्यांवर सल्लागार म्हणून काम केले (१९९१-२०००). अकराव्या लोकसभेचे ते उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते (१९९६-१९९८). पुढे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांची निवड झाली (२०००-२००१). याशिवाय त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर काम केले (२००४-२००९). तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तिवेतन मंत्रालय, संसदीय कामकाज मंत्रालय या खात्यांचा स्वतंत्र कार्यभाग त्यांच्याकडे होता (२००९-२०१०).


केंद्रिय राजकारणात असताना त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यातील समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले. काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड केली (११ नोव्हेंबर २०१०). आघाडी शासनाचे मुख्यमंत्री म्हणून स्थिर शासन, गतिमान पारदर्शी प्रशासन या धोरणास त्यांचे प्रोत्साहन आहे. यासाठी प्रशासनिक कामात झिरो पेंडन्सी’ व ‘कागदपत्रांचे संगणकीकरण’ यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. भारतीय भाषांच्या संगणकीकरणाबद्दल त्यांनी स्वत: संशोधन केले आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या राज्यशासनाच्या विविध विभागांना एकत्र करण्याच्या हेतूने त्यांनी स्वतंत्र मराठी भाषा विभागाची निर्मिती केली (२०१०). या विभागातील मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाबद्दल त्यांना विशेष आस्था आपुलकी असून मराठी भाषेच्या अभिवृध्द्यर्थ केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात ते विशेष रुची घेताना दिसतात. विकासाचे प्रश्न सोडविताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ते प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतात. जैतापूर प्रकल्प, मुंबईच्या विमानतळाचे विस्तारीकरण, कराड येथे भूकंप संशोधन केंद्र उभारणे तसेच मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळवून देणे इ. धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले.


कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची त्यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी आणि कार्यभार वाहताना पारदर्शकतेचे पालन ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि विज्ञान या विषयांत त्यांना विशेष रस आहे. ते दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जिमखाना क्लब, इंडिया हॅबिटॅट सेंटर या संस्थांचे सदस्य आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन या खेळांबरोबरच वाचन आणि संगीत यांचीही त्यांना आवड आहे. त्यांच्या पत्नी सत्त्वशीला या उच्चशिक्षित असून त्या प्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा अशा सामाजिक कार्यात व्यस्त असतात. त्यांना मुलगा (जयसिंग) मुलगी (अंकिता) अशी दोन सुविद्य अपत्ये आहेत.  

 

मिठारी,सरोजकुमार; चेणगे,बसवेश्वर 

खंड विभागणी

Scroll to top